लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या उत्तर टोकावरील कोरची तालुक्यात सोमवारच्या संध्याकाळी नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील कंत्राटदाराचे दोन ट्रॅक्टर आणि एक टिप्पर अशी तीन वाहने जाळली. ही घटना कोटगूल क्षेत्रातील गोडरी गावाजवळ घडली.प्राप्त माहितीनुसार, कोरचीपासून ४६ किलोमीटवर असलेल्या गोडरी गावाजवळ चंद्रपूरच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून रस्त्याच्या खडीकरणाचे काम सुरू होते. सोमवारी (दि.१५) सायंकाळी ५० ते ६० च्या संख्येत आलेल्या नक्षलवाद्यांनी सदर कंपनीच्या रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांमधील डिझेल काढले आणि तेच डिझेल त्या वाहनांवर शिंपडून वाहने पेटवून दिली. या नक्षलवाद्यांमध्ये जवळपास १५ महिला नक्षलवादी होत्या. कोरची तालुक्यात यावर्षी नक्षलवाद्यांनी जाळपोळ करण्याची ही पहिलीच घटना आहे.यादरम्यान ही जाळपोळ होईपर्यंत त्या मार्गावरून येणाऱ्या दोन प्रवासी वाहनांना नक्षलवाद्यांनी रोखून धरले होते. त्यामुळे त्या वाहनातील लोकही घाबरून गेले होते. रात्री पाऊस आल्याने ही वाहने अर्धवट जळाली.गेल्यावर्षी कुरखेडा तालुक्यात अशाच पद्धतीने वाहनांची जाळपोळ करून नक्षलवाद्यांनी पोलिसांना अॅम्बुशमध्ये फसवून त्यांचे वाहन उडविले होते. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी जाळली तीन वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 7:22 PM
गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी (दि.१५) सायंकाळी ५० ते ६० च्या संख्येत आलेल्या नक्षलवाद्यांनी सदर कंपनीच्या रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांमधील डिझेल काढले आणि तेच डिझेल त्या वाहनांवर शिंपडून वाहने पेटवून दिली.
ठळक मुद्दे दोन ट्रॅक्टरसह टिप्परचा समावेश