गडचिरोली : भामरागड-आरेवाडा या नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांनी पत्रके टाकली असून या पत्रकांमध्ये कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे १ मे रोजी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. १९ मे रोजी रविवारी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात बंदचे आवाहन केले आहे. यासाठी एटापल्ली, भामरागड तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलपत्रके टाकली आहेत.या पत्रकांमध्ये जांभुळखेडाच्या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. मागील वर्षी भामरागड तालुक्यातील कसनासूर येथे ४० नक्षलवादी ठार झाले होते. या घटनेचा बदला घेण्यासाठी जांभुळखेडा येथे भूसुरूंग स्फोट घडवून आणला आहे. हा भूसुरूंग स्फोट घडवून आणण्यात सहकार्य करणा-या स्थानिक नक्षलवाद्यांचे कौतुकसुद्धा पत्रकातून केले आहे. तसेच सरकारच्या नितीवर जोरदार टीका केली आहे.सुरजागड लोहप्रकल्पालाही नक्षलवाद्यांनी विरोध दर्शविला आहे. दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात नक्षलपत्रके टाकून नक्षलवादी आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशातच रविवारी १९ मे रोजी बंदचे आवाहन केल्याने दुर्गम भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्षलवाद्यांनी पत्रकातून स्वीकारली भूसुरूंग स्फोटाची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 7:34 PM