संगणकीकृत न झालेल्या शिधापत्रिका रद्द होणार
By admin | Published: August 4, 2015 01:09 AM2015-08-04T01:09:28+5:302015-08-04T01:09:28+5:30
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीचे बायोमेट्रीक पद्धतीने कामकाज करण्यासाठी सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांचे
भामरागड : जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीचे बायोमेट्रीक पद्धतीने कामकाज करण्यासाठी सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. भामरागड तालुक्यातील बहुतेक गावातील नागरिक हे अशिक्षित असल्याने गेल्या आठ महिन्यांपासून संगणकीकृत अर्ज भरणे पूर्ण झालेले नाही. तहसीलदार अरूण येरचे यांनी नुकतीच तहसील कार्यालयात सर्व स्वस्त धान्य दुकानदार व नायब तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, तलाठी यांची विशेष बैठक घेऊन आपापल्या साझामधील गावात भेट देऊन नागरिकांना शिधापत्रिकेच्या अर्जाबद्दल माहिती समजावून सांगा व त्यांच्याकडून अर्ज भरवून घ्या, असे निर्देश दिले. त्यामुळे महसूल कर्मचारी दुर्गम भागात ग्राम भेटीवर निघाले आहेत. याकरिता सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनाही डाटाएंट्री करण्यासाठी अर्ज देण्यात आले आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक, कुटुंब प्रमुख महिला यांचे फोटो, उत्पन्न व्यवसाय नाते, जातीची नोंद, गॅस जोडणीची माहिती यावेळी भरूण घेणे आवश्यक आहे. शिधापत्रिकेचा डाटा भरण्यात आलेला नसल्याने जुन्या शिधापत्रिका रद्द होणार आहे. याची सर्व जबाबदारी शिधापत्रिकाधारकाची राहिल, असे तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे. तालुक्यात ४ हजार ४१४ अंत्योदय, १ हजार ७७५ अन्नसुरक्षा पात्र कुटुंब लाभार्थी, १ हजार ३६१ केसरी व १७५ शुभ्र असे एकूण ७ हजार ६६७ शिधापत्रिकाधारक आहेत.