न.प. शाळांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 05:00 AM2020-07-16T05:00:00+5:302020-07-16T05:00:46+5:30

नगर पालिकेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाची सुविधा असलेल्या शहरात दोन शाळा आहेत. जवाहरलाल नेहरू शाळा रामनगर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संकूल शाळा कॉम्प्लेक्स यांचा समावेश आहे. इतर आठ शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चवथी तर काही शाळा पाचवीपर्यंत आहेत. न.प.शाळेतील शिक्षकांनी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये पालकांना जोडण्यात आले आहे.

N.P. Education from WhatsApp group in schools | न.प. शाळांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून शिक्षण

न.प. शाळांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून शिक्षण

Next
ठळक मुद्देऑनलाईन अध्यापनाचा प्रयत्न : गडचिरोली शहरात १० प्राथमिक शाळांमध्ये प्रयोग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने शहरात प्राथमिक शिक्षण देणाऱ्या १० शाळा चालविल्या जातात. कोरोना लॉकडाऊनच्या स्थितीत पालिकेच्या एकाही शाळेत प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही. मात्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न या शाळांमार्फत सुरू आहे. शिक्षक, पालक व विद्यार्थी अशा माध्यमातून ऑनलाईन अध्ययन, अध्यापनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नगर पालिकेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाची सुविधा असलेल्या शहरात दोन शाळा आहेत. जवाहरलाल नेहरू शाळा रामनगर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संकूल शाळा कॉम्प्लेक्स यांचा समावेश आहे. इतर आठ शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चवथी तर काही शाळा पाचवीपर्यंत आहेत. न.प.शाळेतील शिक्षकांनी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये पालकांना जोडण्यात आले आहे. सदर व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर त्या-त्या विषयाचा अभ्यासक्रम, गृहपाठ दिला जात आहे. घरबसल्या पालक विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन शिक्षण पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गतवर्षीच्या सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते आठवी मिळून सर्व शाळांमध्ये एकूण प्रवेशित १ हजार ५५९ विद्यार्थी होते. पालिकेच्या सर्व शाळा मिळून एकूण ५१ शिक्षक कार्यरत आहेत, अशी माहिती न.प.चे शिक्षण विभाग प्रमुख ताकसांडे यांनी दिली आहे.
शहरात नर्सरीपासून बारावीपर्यंतच्या इंग्रजी माध्यमांच्या काही मोजक्याच नामांकित शाळा आहेत. या शाळांची स्पर्धा करण्यासाठी न.प.प्रशासनाने गेल्या दोन वर्षांपासून इंग्रजी माध्यमातून पूर्वप्राथमिक वर्ग सुरू केले आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना अत्यावश्यक सोयीसुविधा देण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. गुणवत्तेसाठी अधिक प्रयत्न होण्याची गरज आहे.

पूर्वप्राथमिक शिक्षण लांबणीवर
गडचिरोली शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणे पालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळा टिकाव्या, या उद्देशाने न.प.प्रशासनाने गेल्या दोन वर्षांपासून न.प.च्या सर्व शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून पूर्वप्राथमिक वर्ग सुरू केले आहेत. नर्सरी, केजी-१, केजी-२ या वर्गांना गतवर्षी अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मात्र यंदा कोरोना लॉकडाऊनमुळे प्रवेशप्रक्रिया थंडबस्त्यात आहे. शिवाय पालिकेच्या वतीने ऑनलाईन स्वरूपात पूर्वप्राथमिक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. परिणामी यंदा न.प.शाळांमधून मिळणारे पूर्वप्राथमिक शिक्षणाची प्रक्रिया लांबणीवरच पडली असल्याचे दिसून येत आहे.

बऱ्याच पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्धच नाही
नगर परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत कोणतेही शुल्क लागत नाही. त्यामुळे सामान्य व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी या शाळांमध्ये मोठ्या संख्येने दाखल असतात. न.प.शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाही. शिवाय आॅनलाईन शिक्षणासाठी रिचार्ज व इंटरनेट डाटा उपलब्ध असणे गरजेचे आहे. न.प.शाळेच्या शिक्षकांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून शिक्षणाची प्रक्रिया सुरू असली तरी या प्रक्रियेत सुविधांअभावी बरेच पालक सहभागी झाले नसल्याचे दिसून येते. स्मार्ट फोन व इंटरनेट कनेक्शनची अडचण असल्याचेही न.प.च्या शिक्षण विभाग प्रमुखांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: N.P. Education from WhatsApp group in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.