ओबीसीबहुल गावे पेसामुक्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:50 AM2018-09-17T00:50:20+5:302018-09-17T00:52:01+5:30
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून ६ टक्के करण्यात आले. हा ओबीसींवर अन्याय आहे. संपूर्ण जिल्हा पेसा क्षेत्र म्हणून शासनाने घोषित केल्याने ओबीसी युवकांचा नोकरीतील संधीचा मार्ग बंद झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
लखमापूर बोरी : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून ६ टक्के करण्यात आले. हा ओबीसींवर अन्याय आहे. संपूर्ण जिल्हा पेसा क्षेत्र म्हणून शासनाने घोषित केल्याने ओबीसी युवकांचा नोकरीतील संधीचा मार्ग बंद झाला. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करून ओबीसी लोकसंख्या असलेली गावे पेसामुक्त करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून ओबीसींचे आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही खा. अशोक नेते यांनी दिली.
चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथे जय शिवाजी सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, लखमापूर बोरीचे सरपंच संजय दुधबळे, नरेश अल्सावार, सातुपते व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. खा. नेते पुढे म्हणाले, ओबीसींच्या आरक्षणासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असून ५१ टक्केच्यावर आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावांना पेसामध्ये व ५१ टक्केच्यावर ओबीसी असलेल्या गावांना पेसामुक्त करून ओबीसी युवकांना नोकरी भरतीमध्ये पूर्ववत १९ टक्के आरक्षण देण्यात यावी, ही मागणी घेऊन आपण १८ सप्टेंबरला मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करून नव्याने जीआर काढण्याची मागणी करणार. तसेच नोकर भरतीत केवळ १२ पदे नाही तर सर्व पदांना पेसा क्षेत्रातून वगळण्याची मागणी शासनाकडे रेटून धरणार असल्याचे ते म्हणाले. तसेच चामोर्शी तालुक्यातील विकासकामे प्राधान्यांने मार्गी लावणार, अशी ग्वाही खा. अशोक नेते यांनी यावेळी दिली.