मार्कंडा (कं.) पीएचसीतील प्रकार : मजुरांकरवी केली स्वच्छतागृहाची सफाई आष्टी : चामोर्शी तालुक्याच्या आष्टी परिसरातील मार्कंडा (कं.) या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर आहेत. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नहोडे यांना प्रतिनियुक्तीवर कोनसरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाभरापूर्वी पाठविण्यात आले. तेव्हापासून या केंद्रांतर्गत येणाऱ्या १६ गावातील रूग्णसेवेचा भार एकाच डॉक्टरावर आहे. आष्टीपासून तीन किमी अंतरावरील मार्र्कंडा (कं.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्ण व कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृह आहे. मात्र येथे सफाई कामगार कार्यरत असतानाही मजुरांकरवी या स्वच्छता गृहाची सफाई करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बुरे यांचे अधिनस्त कर्मचाऱ्यावर नियंत्रण नाही, याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. अंगणवाडी तपासणी, शाळा तपासणी, शासकीय कामे, शासनाकडून आलेल्या प्रोजेक्टरवर काम करणे तसेच रूग्णांची सेवा आदी कामाच्या तगादाने डॉक्टरांचे कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. सदर आरोग्य केंद्रात सफाई कामगार कार्यरत असताना सुध्दा मजूर लावून शौचालयाची स्वच्छता करावी लागत आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीला चूना लागत आहे. येथील सफाई कामगाराला शासन वेतन देत असताना संबंधित कर्मचाऱ्याची आरोग्य केंद्र स्वच्छतेची जबाबदारी आहे. मार्र्कंडा (कं.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या डॉक्टरांना या केंद्रात परत पाठवावे अथवा दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली. (प्रतिनिधी)
एकाच डॉक्टरवर १६ गावातील रूग्णसेवा
By admin | Published: April 30, 2017 12:41 AM