दोन वाहनांसह एक लाखाची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 06:00 AM2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:32+5:30
चारचाकी व दुचाकी वाहनाने तुळशी मार्गे देसाईगंज शहरात दारू आणली जात आहे, अशी गोपनिय माहिती देसाईगंज पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी या मार्गावर पाळत ठेवली. तुळशी मार्गे एमएच १३ बीएन २४०५ व एमएच ४९ बीएफ ०८३६ हे वाहन येत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी इशारा केल्यानंतर चालकाने वाहन थांबविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : तुळशी मार्गे देसाईगंज शहरात चारचाकी वाहनाने आणली जाणारी दारू देसाईगंज पोलिसांनी जप्त केली आहे. सदर कारवाई शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास केली.
चारचाकी व दुचाकी वाहनाने तुळशी मार्गे देसाईगंज शहरात दारू आणली जात आहे, अशी गोपनिय माहिती देसाईगंज पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी या मार्गावर पाळत ठेवली. तुळशी मार्गे एमएच १३ बीएन २४०५ व एमएच ४९ बीएफ ०८३६ हे वाहन येत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी इशारा केल्यानंतर चालकाने वाहन थांबविले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात ९६ हजार रुपये किमतीची देशी दारू आढळून आली. सोबतच ७ लाख ४५ हजार रुपये किमतीची वाहने, तीन मोबाईल असा एकूण ८ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विजय गजानन संचेती (३३), दिनेश राजेंद्र चहांदे (३५) दोघेही रा. आंबेडकर वार्ड देसाईगंज, विपुल प्रभाकर मेश्राम (२२) रा. सायमारा ता. सावली, अशी आरोपींची नावे आहेत.
या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सदर कारवाई ठाणेदार प्रदीप लांडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय हर्षल नगरकर, पोलीस हवालदार वासुदेव अलोणे, मोरेश्वर गौरकर, गणेश बहेटवार, राजेश शेंडे यांच्या पथकाने केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दारूची अवैध वाहतूक अधिक प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी विशेष पाळत ठेवली आहे. तसेच गोपनिय सूत्रांच्या आधारे माहिती गोळा केली जात आहे.