लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरातील फुले वाॅर्डात गेल्या आठवड्यात आढळलेल्या ३ मृत कोंबड्यांचा ‘बर्ड फ्लू’बाबतचा अहवाल नागपूरनंतर भोपाळ येथील प्रयोगशाळेनेही पॉझिटिव्ह दिला आहे. त्यामुळे शहरात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट करीत फुले वाॅर्डमधील एक किलोमीटरचा परिसर संसर्ग क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या भागातील कोंबड्यांसह सर्वच जिवंत पक्ष्यांना मारून त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे.
मृत कोंबड्यांचा ‘बर्ड फ्लू’बाबतचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. मागील काही दिवसांत राज्याच्या काही भागांत ‘बर्ड फ्लू’ने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले. त्यानंतर गडचिरोली शहरातील फुले वाॅर्डातील कुक्कटपालन करणाऱ्या व्यावसायिकांच्या काही कोंबड्या मृत झाल्याचे आढळून आले. सदर मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. सदर अहवाल मंगळवारी सकारात्मक आला. त्यामुळे जिल्ह्यातील प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी फुले वाॅर्ड येथील संबंधित व्यावसायिकाच्या घराचा परिसर पक्ष्यांसाठी संसर्ग क्षेत्र म्हणून जाहीर केला. ज्या ठिकाणी सदर कोंबड्या मृत झाल्या त्या ठिकाणी केंद्रबिंदू धरून १ कि.मी. त्रिज्येचे संसर्ग क्षेत्र, तसेच १० कि.मी. त्रिज्येचे सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करून प्रतिबंधित करण्यात आले आहे.
फुले वाॅर्डमधील संबंधित व्यावसायिकाच्या प्रक्षेत्रापासून १ ते १० कि.मी. त्रिज्येतील परिसरामधून कुक्कुट पक्ष्यांची बाहेर जाणारी वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन, अंडी, कुक्कुटखत यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे असले तरी १ कि.मी.चा बाधित परिसर वगळून १० कि.मी. क्षेत्रात निरोगी कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्री करण्यास मुभा राहणार आहे.
गडचिरोली तालुक्यात सर्वेक्षण
सर्वेक्षण क्षेत्रांतर्गत गडचिरोली तालुक्यातील कोटगल, इंदाळा, कनेरी, पुलखल, मुडझा, नवेगाव, सेमाना, वाकडी, कृपाळा, मसेली, शिरपूर चेक, विहीरगाव, चांदाळा, बोदली, मेंढा, बामणी, जेप्रा, मुरखळा, उसेगाव, मजोरी, दिभना, राजगट्टा चेक, राजगट्टामाल, खरपुंडी, माडे तुकुम, गोगाव, कुऱ्हाडी, कोंढाणा, चुरचुरा व साखरा ही सर्व गावे पुढील आदेश येईपर्यंत सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. सदर भागात ‘बर्ड फ्लू’ नियंत्रणासंदर्भाने आवश्यक कार्यवाही पशुसंवर्धन विभागाने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिले आहेत.
संक्रमण नियंत्रणासाठी समितीची स्थापना
‘बर्ड फ्लू’बाबत होणारा संसर्ग रोखण्यासाठी व त्यावर आवश्यक उपाययोजना तात्काळ राबविण्यासाठी जिल्हा, तसेच तालुकानिहाय समित्यांची स्थापना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. यामध्ये अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर सदस्यांमध्ये पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपवनसंरक्षक गडचिरोली, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, तसेच इतर महत्त्वाच्या विभाग प्रमुखांचा समावेश आहे. तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली विविध तालुका अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
२५ पेक्षा जास्त कोंबड्या मृत
फुले वाॅर्डातील त्या व्यावसायिकाकडील २५ पेक्षा जास्त कोंबड्या आतापर्यंत मृत झाल्या आहेत. ‘बर्ड फ्लू’ हा आजार केवळ पक्ष्यांमध्ये होत असतो. सदर संसर्ग मनुष्यामध्ये होण्याचे प्रमाण फारच दुर्मिळ असते. तरीसुद्धा खबरदारी आणि ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग पसरू नये म्हणून फुले वॉर्डातील कुक्कुटपालनामधील मृत आणि जीवित कोंबड्यांची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावली जाणार आहे. संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचे त्यासाठी शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आले आहे.