अतिवृष्टीने शेकडो घरे जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:43 PM2018-08-18T23:43:53+5:302018-08-18T23:44:19+5:30
१५ आॅगस्टपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले असून जमीनदोस्त झालेल्या एकूण घरांचा आकडा ३०० च्या वर जाण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घरांच्या पडझडीमुळे अनेक नागरिक बेघर झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा/जिमलगट्टा : १५ आॅगस्टपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले असून जमीनदोस्त झालेल्या एकूण घरांचा आकडा ३०० च्या वर जाण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घरांच्या पडझडीमुळे अनेक नागरिक बेघर झाले आहेत. या नागरिकांना शासनाने तत्काळ मदत द्यावी तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
१६ आॅगस्ट रोजी किष्टापूर नाल्याला पूर आल्याने किष्टापूर गावाला पाण्याचा वेढा बसला होता. नागरिकांनी इकडे तिकडे धाव घेत कसाबसा आपला प्राण वाचविला. मात्र पाळीव प्राणी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गाय, बैल यांची जीवितहानी झाली. घरातील साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. घरात पाणी शिरल्याने मातीची घरे जमीनदोस्त झाली. शेडा गावालाही पुराने वेढा घातला होता. या गावातील २० घरे पाण्याखाली होती. या घरांमध्ये जवळपास चार फूट पाणी होते. किष्टापूर येथील बाजीराव बापय्या सिडाम यांचे घर कोसळले.
जून ते आॅगस्ट या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिरोंचा तालुक्यातील सुमारे ११८ घरांची पडझड झाली असून यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. तीन दिवसांपूर्वी सिरोंचा तालुक्यात अतिवृष्टी झाली. नदी, नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये यामुळे घरांचे नुकसान झाले. सिरोंचा तालुका जंगलाने व्यापला आहे. परिणामी दरवर्षीच पुराचा फटका सिरोंचा तालुक्याला बसतो. अतिवृष्टीनंतर महसूल विभागाने केलेल्या पाहणीत सुमारे ११८ घरांची पडझड झाली असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर एक गाय, एक बैल व एक रेडा मृत्यूमुखी पडला आहे. महसूल विभागाच्या मार्फत सर्वेक्षण केले जात आहे. नुकसान भरपाईची मागणी होत आहे.