लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विकास कार्यकारी (आविका) संस्थांमार्फत गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी धान खरेदी केली जाते. खरीप हंगाम २०१९-२० या हंगामात विकेंद्रीत खरेदी योजनेअंतर्गत धानाची खरेदी करण्यासाठी महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे ५१ केंद्रांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. यापैकी ५० केंद्र मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. सदर ५० केंद्र ३ नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट हे पाच उपप्रादेशिक कार्यालय आहे. या पाचही उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ५० वर आविका संस्था संलग्नित आहेत. या संस्थांमार्फत दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत भावानुसार धानाची खरेदी केली जाते.गडचिरोली जिल्ह्यात हलके, मध्यम व जड या तीन प्रतीच्या धानपिकाची लागवड केली जाते. दिवाळी सणापासून हलक्या धानाची कापणी व बांधणीचे काम सुरू आहे. काही शेतकऱ्यांच्या धानाची कापणी व बांधणीचे काम आटोपले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस बरसत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. काही शेतकऱ्यांच्या हलक्या धानाचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी लगबगीने बांधणी करून पुंजने टाकले. मळणीनंतर हलक्या धानाची शेतकरी विक्री करीत असतात. मात्र अवकाळी पावसाची स्थिती कायम असल्याने शेतकरी सध्या तरी मळणीचे काम हाती घेणार नाही. परिणामी हलक्या धानाच्या खरेदीच्या हंगामास यावर्षी उशिरा सुरूवात होणार आहे.आसमानी संकट मिटल्याशिवाय जिल्ह्यातील शेतकरी मळणी करून हलक्या प्रतीचे धान आविका संस्थेच्या केंद्रावर आणणार नाही. असे असले तरी खरीप हंगामात धानाची खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळासह आविका संस्थांनी कार्यवाही पूर्ण केली आहे.साधारणत: ३ नोव्हेंबरपासून कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा, घोट आदी तालुक्यातील धान खरेदी केंद्र टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. हलक्या प्रतीच्या धानाचे पीक प्रामुख्याने आरमोरी, कुरखेडा तसेच कोरची तालुक्यात घेतले जाते. जिल्ह्याच्या दक्षिण भागात म्हणजे अहेरी उपविभागात तसेच गडचिरोली व चामोर्शी तालुक्यात मध्यम व जड प्रतीच्या धानाचे पीक अधिकाधिक घेतले जाते. धान खरेदी केंद्र लवकर सुरू न झाल्यास शेतकºयांना आपला धान व्यापाऱ्यांना विकून आर्थिक अडचण भागवावी लागणार आहे.यंदा धानाच्या भावात ६५ रुपयांनी वाढशासनाने यंदा धानाचा हमीभाव जाहीर केला असून मागील वर्षीच्या तुलनेत धानाच्या भावात ६५ रुपयांनी वाढ केली आहे. यावर्षी सर्वसाधारण धानाला प्रतीक्विंटल १ हजार ८३५ रुपये हमीभाव जाहीर केला असून याच दराने आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने खरेदी केंद्रावर धानाची खरेदी करण्यात येणार आहे. गतवर्षी महामंडळाच्या केंद्रावर साधारण धानाला प्रतिक्विंटल १ हजार ७५० रुपये भाव देण्यात आला होता. धानाचा भाव वाढल्याबाबतचा शासन निर्णय ९ सप्टेंबर २०१९ रोजी राज्य शासनाने निर्गमित केला आहे.
३ पासून धान खरेदी केंद्र सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 6:00 AM
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट हे पाच उपप्रादेशिक कार्यालय आहे. या पाचही उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ५० वर आविका संस्था संलग्नित आहेत. या संस्थांमार्फत दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत भावानुसार धानाची खरेदी केली जाते.
ठळक मुद्देकार्यवाही अंतिम टप्प्यात : आदिवासी विकास महामंडळाच्या ५० केंद्रांना मंजुरी