रात्रीच्या बसअभावी प्रवाशांची परवड
By admin | Published: October 30, 2014 10:51 PM2014-10-30T22:51:58+5:302014-10-30T22:51:58+5:30
गडचिरोली-आरमोरी-वडसा-कुरखेडा मार्गे रात्री ९ वाजता बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्याबरोबरच कुरखेडा-वडसा-आरमोरी-गडचिरोली मार्गे सकाळी ५ वाजताची
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी-वडसा-कुरखेडा मार्गे रात्री ९ वाजता बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्याबरोबरच कुरखेडा-वडसा-आरमोरी-गडचिरोली मार्गे सकाळी ५ वाजताची बस नसल्याने विविध कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचारी व इतर प्रवाशांना ताटकळत बसस्थानकावर राहावे लागत आहे. त्यामुळे या मार्गे सकाळी ५ व रात्री ९ वाजताची बस सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
कुरखेडावरून गडचिरोलीमार्गे बसची सुविधा नसल्याने प्रवाशांना खासगी जडवाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सदर मार्गावरून अनेक कर्मचारी तसेच इतर नागरिकही नेहमीच प्रवास करतात. मात्र बसची सुविधा नसल्याने या प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. त्याबरोबरच गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज-कुरखेडा मार्गे रात्री ९ वाजताची बस उपलब्ध नसल्याने कार्यालयीन काम आटोपून घरी परतणाऱ्या कर्मचारी व नागरिकांना अनेकदा आरमोरी व देसाईगंज तर कधी गडचिरोलीतच मुक्काम ठोकावा लागतो. परिणामी अनेकदा महत्वपूर्ण कामे वेळेवर होऊ शकत नाही. जिल्हा मुख्यालयातूनही सदर मार्गे सकाळच्या सुमारास जाणाऱ्या प्रवाशांनाही बसची सुविधा वेळेवर उपलब्ध होण्यास अडचण जात आहे. त्यामुळे गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज-कुरखेडा मार्गे रात्री ९ वाजताची तर कुरखेडा - देसाईगंज - आरमोरी -गडचिरोली मार्गे सकाळी ५ वाजताची बस सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)