समुपदेशन कमिटी ठरविणार परीक्षा आयोजनाचा पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 05:00 AM2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:01:10+5:30

गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील २००५ महाविद्यालय संलग्नित आहेत. सदर महाविद्यालयातील विविध विभाग व विद्यापीठाचे कॅम्पस मिळून यावर्षी एकूण १ लाख ४ हजार विद्यार्थी उन्हाळी परीक्षा देणार होते. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. मात्र कोरोना संचारबंदीच्या कालावधीत इतक्या मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजित करणे अडचणीचे ठरू शकते.

The pattern of examination planning will be decided by the counseling committee | समुपदेशन कमिटी ठरविणार परीक्षा आयोजनाचा पॅटर्न

समुपदेशन कमिटी ठरविणार परीक्षा आयोजनाचा पॅटर्न

Next
ठळक मुद्देशासनाकडून मुभा : गोंडवाना विद्यापीठात सुरू आहे चर्चेतून मंथन; अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्याच होणार परीक्षा

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विद्यापीठाअंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परीक्षा घेण्यास गोंडवाना विद्यापीठाला परवानगी दिली आहे. सदर परीक्षाच्या आयोजनाबाबत विद्यापीठस्तरावर जिल्हा समुपदेशन कमिटी गठीत करण्यात आली असून ही कमिटी परीक्षा आयोजनाचा पॅटर्न निश्चित करणार आहे. विशेष म्हणजे परीक्षा आयोजनाबाबतच्या चर्चेत गोंडवाना विद्यापीठात मंथन करण्यात येत असून हा पॅटर्न मंगळवारी सायंकाळपर्यंत निश्चित होणार असल्याची माहिती आहे.
गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील २००५ महाविद्यालय संलग्नित आहेत. सदर महाविद्यालयातील विविध विभाग व विद्यापीठाचे कॅम्पस मिळून यावर्षी एकूण १ लाख ४ हजार विद्यार्थी उन्हाळी परीक्षा देणार होते. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. मात्र कोरोना संचारबंदीच्या कालावधीत इतक्या मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजित करणे अडचणीचे ठरू शकते. परिणामी फिजिकल डिस्टन्स ठेवणे शक्य होत नाही. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास विद्यापीठाला परवानगी दिली आहे.
सर्व अभ्यासक्रम मिळून अंतिम वर्षाच्या परीक्षार्थ्यांची संख्या ३० ते ३५ हजार एवढी आहे. अंतिम वर्षाच्या व अंतिम सत्राच्या परीक्षा १ ते ३० जुलैदरम्यान विद्यापीठाने आयोजित कराव्या, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने म्हटले आहे. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ हे कोरोनाच्याबाबत ग्रीन झोनमध्ये येत असल्याने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत शासनाने मुभा दिली आहे.
यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षांचे आयोजन करणे, त्याचा पॅटर्न ठरविणे यासाठी विद्यापीठस्तरावर जिल्हा समुपदेशन कमिटी गठीत करण्यात आली आहे.
या कमिटीमध्ये विद्यापीठाच्या विविध विद्या शाखेच्या आठ अधिष्ठातांचा समावेश आहे. यामध्ये डॉ.कावळे, डॉ.सुरेश रैवतकर, डॉ.सूर्या, डॉ.साकुरे, डॉ.हंसा तोमर, डॉ.योगेश पचारे तसेच विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालन डॉ.अनिल चिताडे आदींचा समावेश आहे.
सदर कमिटीच्या बैठका सुरू असून परीक्षा आयोजनाबाबत चर्चा केली जात आहे.

भौगोलिक परिस्थितीनुसार ठरणार तारखा
१ ते ३१ जुलैदरम्यान गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षीच्या पावसाळ्यातील अनुभव लक्षात घेता पूरपस्थिती निर्माण होत असते. जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्यास अहेरी उपविभागासह कोरची, धानोरा, कुरखेडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना पूरपरिस्थितीत परीक्षा देणे शक्य होत नाही. विद्यापीठ यंत्रणेला सुद्धा परीक्षेचे आयोजन करणे कठीण होईल. गडचिरोली जिल्ह्यात नदी, नाल्यांची संख्या अधिक असल्याने १५ जुलैनंतर परीक्षा घेणे धोक्याचे आहे, अशीही चर्चा जिल्हा समुपदेशन कमिटीच्या बैठकीत करण्यात आली. नापास विद्यार्थी, एटीकेटी घेतलेले विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन भौगोलिक परिस्थितीनुसार परीक्षा तारखा ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: The pattern of examination planning will be decided by the counseling committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.