एटापल्लीच्या मुख्य रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:17 PM2018-03-19T23:17:57+5:302018-03-19T23:17:57+5:30
अहेरी उपविभागाच्या एटापल्ली तालुक्यातील मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सदर मार्गावरील पूलही क्षतिग्रस्त झाल्याने राज्य परिवहन महामंडळाने एटापल्ली-जारावंडी मार्गावरील बसफेरी बंद केली आहे.
आॅनलाईन लोकमत
एटापल्ली : अहेरी उपविभागाच्या एटापल्ली तालुक्यातील मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सदर मार्गावरील पूलही क्षतिग्रस्त झाल्याने राज्य परिवहन महामंडळाने एटापल्ली-जारावंडी मार्गावरील बसफेरी बंद केली आहे. अशीच परिस्थिती एटापल्ली तालुक्याच्या अनेक मुख्य मार्गांची आहे.
एटापल्ली-गट्टा, एटापल्ली-येमली यासह अनेक मार्गांची अवस्था बकाल झाली आहे. मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून गिट्टी बाहेर आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णवाहिकेतून अहेरीकडे नेणाऱ्या रुग्णांचे रस्त्याच्या दुरवस्थेने हाल होत आहे. रस्त्याच्या या बकाल अवस्थेने रुग्णवाहिकेतून नेत असलेल्या गर्भवती महिलेची रस्त्यावर प्रसूती झाली व बाळ दगावल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाल्याने या तालुक्यात प्रमुख मार्गांवर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
तालुक्यातील एटापल्ली-आलापल्ली हा मार्ग बºयापैकी आहे. या मार्गाची क्षमता १० टन माल वाहतुकीची आहे. मात्र या मार्गावरून ५० पेक्षा अधिक टन लोह दगडाची वाहतूक ट्रकांद्वारे मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय या मार्गावर लोह दगडाचे शेकडो ट्रक धावत आहेत. त्यामुळे सदर मार्ग अधिक दिवस टिकणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच अहेरी तालुक्यातील प्रमुख मार्गांकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे.