वैरागडातील फेडरेशनच्या केंद्रावर शेतकऱ्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 05:00 AM2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:15+5:30
भारतीय खाद्य निगम महाराष्ट्र सरकारकडून ग्रामीण भागासाठी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने प्रती क्विंटल १ हजार ८२५ रुपये हमीभाव देऊन धानाची खरेदी केली जाते. नागरी भागासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत खरेदी-विक्री संस्था आरमोरीच्या वतीने वैरागड येथे धान खरेदी केंद्र यंदाच्या खरीप हंगामात सुरू करण्यात आले. येथे शेतकऱ्यांकडून क्विंटलमागे ४० रुपये हमाली म्हणून घेतले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन गडचिरोली अंतर्गत वैरागड येथे महाराष्ट्र राईसमिलच्या गोदामात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र या केंद्रावर धानाचे मोजमाप करताना शेतकऱ्यांना क्विंटलमागे ४० रुपये हमाली म्हणून द्यावी लागत आहे. येथे केंद्रसंचालकांचा मनमानी कारभार सुरू आहे, असा आरोप अनेक शेतकºयांनी केला आहे.
भारतीय खाद्य निगम महाराष्ट्र सरकारकडून ग्रामीण भागासाठी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने प्रती क्विंटल १ हजार ८२५ रुपये हमीभाव देऊन धानाची खरेदी केली जाते. नागरी भागासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत खरेदी-विक्री संस्था आरमोरीच्या वतीने वैरागड येथे धान खरेदी केंद्र यंदाच्या खरीप हंगामात सुरू करण्यात आले. येथे शेतकऱ्यांकडून क्विंटलमागे ४० रुपये हमाली म्हणून घेतले जात आहेत.
याच परिसरात देलनवाडी, कढोली, उराडी येथे आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत आविकास संस्थांच्या वतीने धान खरेदी केंद्र सुरू आहे. मात्र या केंद्रांवर हमालीचे पैसे शेतकऱ्यांकडून घेतले जात नाही. भारतीय खाद्य निगमचे धोरण व नियम सर्वांसाठी सारखे असताना फेडरेशनच्या केंद्रावर शेतकऱ्यांकडून हमाली घेतली जाते. हे अन्यायकारक असल्याचे सांगत क्विंटलमागे २० रुपये हमाली देण्याबाबत आक्षेप घेतला आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन्ही संस्थेचे नियम सारखे असताना वैरागड येथील केंद्र संचालक नियमांची पायमल्ली करून फेडरेशनच्या केंद्रावर शेतकऱ्यांकडून हमालीच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहे. संबंधित केंद्र संचालकावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
केंद्रावर हमाली करणाऱ्या मजुरांना पाच ते सहा महिने मजुरी मिळते. त्यानंतर त्यांना काम मिळत नाही. मग ते पोट कसे भरणार म्हणून प्रत्येक ४० किलोच्या पोत्यामागे १० रुपयेप्रमाणे हमाली घेतली जात आहे. धानाचे मोजमाप प्रथम व्हावे, यासाठी शेतकरी केंद्रावर मजुरी करणाºया लोकांना पैसे देण्यास तयार होतात.
- अमित पुसाम,
केंद्र प्रमुख, धान खरेदी केंद्र, वैरागड