लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील ९ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसह ४६ ग्रामपंचायतींमधील ७१ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत आणि कोणताही नक्षली अडथळा न येता निर्विघ्नपणे मतदान झाले. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणेनेही सुटकेचा निश्वास सोडला. नगरपंचायतींमधील ७५.४१ टक्के मतदारांनी तर ग्रामपंचायतींमधील ७३.७२ टक्के मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला.
या निवडणुकीत नगरपंचायतींच्या १४२ जागांसाठी ५५५ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे सर्वच ठिकाणी चांगली चुरस निर्माण झाली होती. मात्र, ग्रामपंचायतींच्या अनेक जागांसाठी एकही नामांकन आले नसल्यामुळे २०० पेक्षा अधिक जागा रिक्त राहणार आहेत. ४६ ग्रामपंचायतींमधील केवळ ७१ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. नगरपंचायतींसाठी सर्वाधिक ८८.८६ टक्के मतदान कोरची येथे झाले. त्याखालोखाल ८७.७३ टक्के मुलचेरात झाले. सर्वात कमी ६७.४९ टक्के मतदान भामरागडमध्ये झाले. सकाळी ७.३० पासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. दुपारी ३ वाजता रांगेत असलेल्या सर्वांना केंद्राच्या आत घेऊन बाहेरील फाटक बंद करण्यात आले.
उमेदवारांच्या प्रतिनिधींचा बिनधास्त वावरचामोर्शीसह इतर काही ठिकाणच्या मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या प्रतिनिधींचा मतदान केंद्राच्या परिसरात बिनधास्त वावर होता. रांगेत उभ्या मतदारांना ते वारंवार सूचनाही करत होते. बाहेरगावी असलेल्या मतदारांना आर्थिक प्रलोभन देऊन मतदानासाठी बोलविण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे या निवडणुकीत ज्या प्रभागात तगडे उमेदवार आहेत, त्या प्रभागातील मतदारांनी संधीचे सोने केल्याची चर्चा मतदान केंद्र परिसरात सुरू होती.
‘पिंक बुथ’ने वेधले लक्षनक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील एटापल्ली येथे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शुभम गुप्ता यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणासाठी पहिल्यांदाच ‘पिंक बुथ’ निर्माण करण्यात आला होता. समूह निवासी शाळा खोली क्रमांक २ येथे केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, एवढेच नाही तर बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व महिलाच होत्या. या बुथचे प्रवेशद्वार, लक्षवेधी सेल्फी पॉईंट, केंद्रातील पडदे, फुगे सर्वकाही गुलाबी रंगात होते. महिला कर्मचारीही गुलाबी पोषाखात होत्या. या उपक्रमासाठी तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय एसडीपीओ डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला.