ऑनलाईन सेवांच्या गर्दीत पोस्ट विभागही डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 05:00 AM2020-10-11T05:00:00+5:302020-10-11T05:00:15+5:30

९ ऑक्टोबर हा जागतिक टपाल म्हणून साजरा केला जातो. परंतु यावर्षी राष्ट्रीय टपाल सप्ताह पाळला जात आहे. या माध्यमातून टपालाशी संबंधित विविध योजना व विभागांच्या कार्यप्रणालीची माहिती जनतेत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. चंद्रपूरच्या अधीक्षक डाकघरांतर्गत गडचिरोली डाक विभागाचा समावेश होतो. गडचिरोली जिल्ह्यात १८ डाकघरे, ३११ शाखा डाकघरे आहेत. त्यामानाने चंद्रपूर जिल्ह्यात ३६ डाकघरे, २९३ शाखा डाकघरे आहेत.

The post section is also digital in the crowd of online services | ऑनलाईन सेवांच्या गर्दीत पोस्ट विभागही डिजिटल

ऑनलाईन सेवांच्या गर्दीत पोस्ट विभागही डिजिटल

Next
ठळक मुद्देइंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत मिळताहे सुविधा; नेट बँकिंगचाही वापर वाढला, राष्ट्रीय टपाल सप्ताह

गोपाल लाजुरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पोस्टाचे व्यवहार कटकटीचे, मंद व गैरसोयीचे आहेत, हा समज पूर्वी जनसामान्यांत होता. परंतु आता ऑनलाईन सेवांच्या गर्दीत पोस्ट विभागानेही आधुनिक बदल केला असून अनेक सेवा ऑनलाईन केल्या आहेत. बँकेच्या धर्तीवर अनेक सोयीसुविधा ग्राहक व खातेदारांना मिळत असल्याने पोस्ट विभागाने जुन्या पारंपरिक पद्धतीत बदल करून आधुनिकतेची कास धरून डिजिटल धोरण स्वीकारले आहे.
९ ऑक्टोबर हा जागतिक टपाल म्हणून साजरा केला जातो. परंतु यावर्षी राष्ट्रीय टपाल सप्ताह पाळला जात आहे. या माध्यमातून टपालाशी संबंधित विविध योजना व विभागांच्या कार्यप्रणालीची माहिती जनतेत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. चंद्रपूरच्या अधीक्षक डाकघरांतर्गत गडचिरोली डाक विभागाचा समावेश होतो. गडचिरोली जिल्ह्यात १८ डाकघरे, ३११ शाखा डाकघरे आहेत. त्यामानाने चंद्रपूर जिल्ह्यात ३६ डाकघरे, २९३ शाखा डाकघरे आहेत. या माध्यमातून ग्राहक व खातेदारांना टपालासह शासकीय सेवांचा लाभ दिला जात आहे. या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूरचे डाकघर अधीक्षक ए. एन. सुशिर यांनी केले.

बचत खातेदारांनाही सोय
बँकेच्या खातेदारांना व्यवहार करण्यासाठी नेट बँकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा प्रचलित झाली आहे. पोस्ट विभागसुद्धा यात मागे नाही. पोस्ट विभागाने पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते सुरू करणाऱ्या ग्राहकांनासुद्धा नेट बँकिंगची सुविधा दिली आहे. या सेवेचा अनेक ग्राहक वापर करीत आहेत.

५ स्टार विलेज कार्यक्रम
ग्रामीण भागातील खातेदारांना व ग्राहकांना पोस्टाच्या माध्यमातून अधिकाधिक बँकिंग सुविधा मिळावी, यासाठी विविध योजनांचा थेट लाभ देण्यासाठी फाईव्ह स्टार विलेज कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत निश्चित गावांमध्ये विशिष्ट पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून सेवांचा लाभ दिला जात आहे.

पोस्ट ऑफिस कॉमन सर्विस सेंटरद्वारे १११ योजना व सेवा
पोस्ट ऑफिस कार्यालयात केवळ टपाल, बचत खाते यावरच काम न करता पोस्ट ऑफिस कॉमन सर्विस सेंटर सुरू केले आहे. या माध्यमातून योजना व सुविधांचा लाभ दिला जात आहे.
सर्विस सेंटरमधून १११ योजना व सोयींचा लाभ नागरिकांना दिला जात आहे. आधार, पॅनकार्ड, पासपोर्ट सेवा, न्यू पेंशन स्किम, रेल्वे तिकीट बुकिंग, आयष्यमान भारत आदींचा समावेश आहे.
पोस्टात बचत खाते, आवर्ती ठेव, पोस्ट एटीएम, भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, विमा, अटल पेंशन योजना यासह अन्य योजना आहेत.

कोणत्याही बँक खात्यातून पैैसे काढण्याची सुविधा
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत बँक ग्राहकांना केवळ आधार क्रमांक व एईपीएसद्वारे त्यांच्या कोणात्याही बँक खात्यातून रक्कम काढण्याची नि:शुल्क सुविधा पोस्ट विभागाने उपलब्ध करून दिली आहे. शहरी व ग्रामीण भागातच नव्हे तर अतिदुर्गम भागातसुद्धा ग्रामीण डाकसेवकांच्या मार्फत घरपोच सुविधा दिली जात आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक आव्हानांवर मात करीत अनेकांनी या सुविधेचा लाभ घेतला. ग्राहक आपल्या घरातच मोबाईल बँकिंग अ‍ॅपद्वारे पोस्टाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा वापर करू शकतात. कोणत्याही बँक शाखेत पैसे काढण्याची सुविधा पोस्टाने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

Web Title: The post section is also digital in the crowd of online services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.