गडचिरोली : धानोरा - मुरुमगाव मार्गावरील खड्डे दररोज अपघाताला निमंत्रण देत आहेत. मुरूमगाववरून धानोराकडे येणारी एसटी महामंडळाची बस रोडवरील खड्ड्यामुळे स्टेरिंग फ्रीज झाल्याने नाल्याच्या पुलावरून खाली पडता पडता अडकली. बसमधील प्रवाशी बालंबाल बचावले व मोठा अनर्थ टळला. सदर घटना २१ जुलै रोजी शुक्रवारला दुपारच्या सुमारास घडली.
धानोरा - मुरूमगाव मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळा सुरू असल्याने पावसाचे पाणी खड्ड्यात साचले आहे. परीणामी वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे या मार्गावर अपघाताची मालिका सुरू झाली आहे. एसटी महामंडळाची गडचिरोली आगाराची एम. एच. ४० एन. ९५४४ या क्रमांकाची बस गडचिरोलीवरून प्रवासी घेऊन मुरूमगावला गेली हाेती. तेथून धानोरा मार्गे गडचिरोलीकडे परत येत असताना धानोरा येथील जुन्या तहसील कार्यालयाजवळ दुपारी १.३० वाजताच्या सुमारास विना कठड्याच्या नाल्यावरील पुलाजवळ असणाऱ्या खड्ड्यात गेल्याने स्टेरिंगमध्ये बिघाड येऊन चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बसचे एक चाक पुलाच्या खाली उतरले व बस तिथेच थांबल्याने मोठा अनर्थ टळला.
या बसमध्ये चालक वाहकासह जवळपास दहा प्रवासी होते. नाला पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. बस नाल्यात पडली असती तर अनेक प्रवाशांचा जीव जाण्याची शक्यता होती. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. वृत्त लिहीस्ताेवर बस तिथेच लटकली होती. बसमधील प्रवाशांनी रस्ते बांधकाम विभागाबद्दल रोष व्यक्त केला.