बिल थकले : २५० पेक्षा अधिक अंगणवाडी केंद्रातीलदिलीप दहेलकर - गडचिरोलीअंगणवाडीतील लहान बालकांना कोंदट व अंधारमय वातावरणातून बाहेर काढण्यासाठी मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये विद्युतीकरणाचे काम करण्यात आले. मात्र अनेक अंगणवाड्यांचे विद्युत बिल गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत आहे. सदर थकीत विद्युत बिलाचा प्रशासनाने भरणा न केल्यामुळे विद्युत विभागाने गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी केंद्रातील विद्युत जोडणीच्या कपातीचा सपाटा लावला आहे. सद्य:स्थितीत जिल्हाभरातील जवळपास २५० पेक्षा अधिक अंगणवाडी केंद्रांची वीज कपात करण्यात आली आहे. मागास क्षेत्र अनुदान निधीअंतर्गत मार्च २०१३ अखेर बाराही तालुक्यातील १ हजार १५८ अंगणवाड्यांमध्ये विद्युतीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली. या विद्युतीकरणाच्या कामाची सुरूवात २०१३-१४ या वर्षात झाली. त्यापैकी आजच्या घडीस १ हजार पेक्षा अधिक अंगणवाड्यांमध्ये विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पाच-सहा महिन्यापूर्वी ज्या अंगणवाडी केंद्रांमध्ये मीटर बसविण्यात आले. त्या अंगणवाडी केंद्रांना विद्युत विभागाने विद्युत देयके पाठविलीत. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने या विद्युत बिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे थकीत विद्युत बिलाचा मुद्दा डीपीडीसीच्या बैठकीत गाजला होता. या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी डीपीडीसीच्या निधीतून अंगणवाडी केंद्रांचे थकीत विद्युत बिल भरण्याची घोषणा केली होती. यासाठी जि.प. महिला व बालकल्याण विभागाला जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र सदर कार्यवाही थंडबस्त्यात आहे. यामुळे अंगणवाडी केंद्रांचे थकीत विद्युत बिल अद्यापही भरण्यात आले नाही. परिणामी विद्युत विभागाने कठोर पावले उचलत गेल्या २० ते २५ दिवसांपासून अंगणवाडी केंद्रातील विद्युत जोडणी कपात करण्याचा सपाटा लावला आहे. आरमोरी तालुक्यातील एकूण ९०४ अंगणवाडी केंद्रांपैकी ६० अंगणवाडी केंद्रातील विद्युत जोडणी कपात केली आहे. एटापल्ली तालुक्यातील सात अंगणवाडी केंद्रांचे विद्युत मीटर विद्युत विभागाने काढून आपल्या ताब्यात घेतले आहे. कोरची तालुक्यातील ७ अंगणवाडी केंद्रातील विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. सिरोंचा तालुक्यातील ७८ अंगणवाड्या केंद्रांमध्ये विद्युत मीटर लावण्यात आले होते. मात्र थकीत विद्युत बिलामुळे विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १० मीटर काढून ताब्यात घेतले आहे. तर दोन अंगणवाडी केंद्र वगळून इतर सर्व अंगणवाडी केंद्रातील विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. देसाईगंज तालुक्यातील ७२ अंगणवाडी केंद्रात विद्युत मीटर लावण्यात आले होते. मात्र थकीत विद्युत बिलामुळे बहुतांश विद्युत मीटर संबंधीत विभागाने काढून ताब्यात घेतले आहे. तर काही केंद्रांचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. थकीत विद्युत देयके असलेल्या अन्य अंगणवाडी केंद्रातील विद्युत मीटर काढणे तसेच विद्युत पुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही विद्युत विभागाच्यावतीने सुरू आहे. परिणामी अंगणवाडी केंद्रातील पंखे व दिवे बंद पडल्याने बालकांना अंधारातच शिक्षण घ्यावे लागत आहे.
वीज जोडणी कापली
By admin | Published: November 01, 2014 10:51 PM