लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या तीन वर्षात जिल्हाभरात सुमारे ४ हजार १५९ शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या शेततळ्यांच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आकस्मिक स्थितीत पावसाने धोका दिल्यास शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी या शेततळ्यांचा उपयोग होत आहे.गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती केली जाते. या शेतीला सिंचनाची आवश्यकता आहे. मात्र जिल्ह्यात एकही मोठा सिंचन प्रकल्प नसल्याने सिंचनाची सुविधा गंभीर झाली आहे. मोठे सिंचन प्रकल्प बांधणे शक्य नसल्याने शासनाने आता विहीर, शेततळे खोदून देण्यास प्राधान्य दिले आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल या उद्देशाने शासनाने गडचिरोली जिल्ह्यासाठी मागेल त्याला शेततळे बांधून देण्याची योजना सुरू केली. गडचिरोली जिल्ह्यात १ हजार ५०० शेततळे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. २०१६ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत जिल्हाभरात ४ हजार १५९ शेततळे बांधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दुर्गम भागातील शेतकºयांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.यावर्षी पावसाने दडी मारल्याने धानपीक करपायला लागले होते. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी शेततळ्याच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काही शेतकऱ्यांनी शेततळ्यांमध्ये मासेमारीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे रोजगाराचे साधन उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. काही शेततळे मात्र लवकरच आटत असल्याने बेकामी होतात.उद्दिष्टापेक्षा सहा पट जास्त निर्मितीगडचिरोली जिल्ह्याला १ हजार ५०० शेततळे खोदण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ४ हजार १५९ शेततळ्यांचे कामे पूर्ण झाली आहेत. ८ हजार १५३ शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ८ हजार १०७ शेततळे बांधकामास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. सुमारे ६ हजार ७२ शेततळे बांधण्याचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. ५ हजार ७३९ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे. उद्दिष्टाच्या जवळपास सहा पट शेततळे बांधली जाणार आहेत. काही जिल्ह्यांमध्ये शेततळे योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. उद्दिष्टापेक्षा अत्यंत कमी अर्ज प्राप्त झाले. मात्र गडचिरोली जिल्ह्यात या योजनेला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला आहे. सिंचन वाढेल, अशी अपेक्षा आहे.
चार हजार शेततळ्यांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:23 PM
गेल्या तीन वर्षात जिल्हाभरात सुमारे ४ हजार १५९ शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या शेततळ्यांच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
ठळक मुद्देआकस्मिक स्थितीत लाभ : मागेल त्याला शेततळे योजनेला भरभरून प्रतिसाद