विद्यापीठासमोर प्राध्यापकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:12 PM2019-06-17T23:12:09+5:302019-06-17T23:12:27+5:30
युजीसी व केंद्र शासनाने मान्य केलेला सातवा वेतन आयोग राज्य शासनाने जसाच्यातसा लागू करावा, या मागणीसाठी एमफुक्टो व घटक संघटना नुटाच्या वतीने प्राध्यापकांनी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जवळपास ७० प्राध्यापक सहभागी झाले होते. निदर्शनानंतर कुलगुरूमार्फत राज्य शासनाला निवेदन पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : युजीसी व केंद्र शासनाने मान्य केलेला सातवा वेतन आयोग राज्य शासनाने जसाच्यातसा लागू करावा, या मागणीसाठी एमफुक्टो व घटक संघटना नुटाच्या वतीने प्राध्यापकांनी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जवळपास ७० प्राध्यापक सहभागी झाले होते. निदर्शनानंतर कुलगुरूमार्फत राज्य शासनाला निवेदन पाठविण्यात आले.
युजीसीने व केंद्र शासनाने मान्य केलेल्या वेतन आयोगात महाराष्टÑ शासनाने प्राध्यापकांवर अन्याय होईल, अशी मोठी दुरूस्ती करून ८ मार्च २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित केला. त्यानेही समाधान झाले नाही, म्हणून १० मे रोजी पुन्हा शासन निर्णय निर्गमित केला. या नवीन शासन निर्णयात एमफील, पीएचडीच्या वेतनवाढ नाकारण्यात आल्या आहेत. आरसी/ओसी पूर्ण करण्याची वाढीव मुदत नाकारली आहे. युजीसीने मान्यता दिलेले उपप्राचार्य पद नाकारले आहे. पदोन्नती करताना निर्धारीत दिनांकाऐवजी मुलाखतीचा दिवस ग्राह्य मानण्याची चुकीची पध्दत लागू केली जाणार आहे. अर्धवेळ प्राध्यापकांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. रजेच्या समान परिनियमात ढवळाढवळ करण्यात आली आहे. या सर्व बाबी प्राध्यापकांवर अन्याय करणारे आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ जून रोजी विद्यापीठासमोर प्राध्यापकांनी निदर्शने दिली. त्यानंतर शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ.नामदेव कल्याणकर यांच्या मार्फत राज्य शासनाला निवेदन पाठविले. कुलगुरूंना निवेदन देण्यापूर्वी प्रा. डॉ. पुरूषोत्तम बोरकर व प्रा. डॉ. हितेंद्र धोटे यांनी प्राध्यापकांवर कसा अन्याय होत आहे, हे सविस्तर स्पष्ट करून दाखविले. निवेदन देतेवेळी प्रा.डॉ. पुरूषोत्तम बोरकर, प्रा.डॉ. योगेश दुधपचारे, प्रा.डॉ. प्रकाश शेंडे, प्रा. डॉ. राजेंद्र घोनमोडे, प्रा.डॉ. हितेंद्र धोटे हजर होते. आंदोलनात प्रा.डॉ. गंगाधर जुआरे, प्रा. डॉ. रमेश ठोंबरे, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. किशोर हजारे, प्रा. खोपे, प्रा. मुंगमोडे, प्रा. निहार बोदेले, प्रा. रमेश धोटे, प्रा. डॉ. बाळू कांगरे आदी हजर होते.
२४ ला पुणे येथे आंदोलन
प्राध्यापकांच्या मागण्या मान्य न झाल्यास २४ जून रोजी पुणे येथील संचालक कार्यालयासमोर १ जुलै रोजी आझाद मैदान मुंबई व २२ जुलै रोजी नवीदिल्ली येथे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नुटाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. जे.पी. देशमुख, सचिव प्रा.डॉ. राजेंद्र घोनमोडे, डॉ. साळुंखे, डॉ. बाळू कोंगरे यांनी केले आहे.