रांगी : येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे शुक्रवारच्या रात्री काही समाजकंटकांनी हात तोडून विटंबना केली. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी बाजार चौकातील समाज मंदिर परिसरात रांगीवासीयांनी निषेध सभा घेतली. या सभेत उपस्थित मान्यवर व नागरिकांनी समाज विघातक कृत्य करणाऱ्या समाजकंटकाचा जाहीर निषेध केला. निषेधसभेच्या अध्यक्षस्थानी अखील भारतीय गुरूदेव सेवामंडळ गडचिरोलीचे अध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे होते. प्रमुख अतिथी म्हणून अरविंद वासेकर, दलितमित्र नानाजी वाढई, रांगीचे सरपंच जगदिश कन्नाके, उपसरपंच नरेंद्र भुरसे, शशीकांत साळवे, प्रकाश काटेंगे, तंमुस अध्यक्ष शामराव बोरकर, तलाठी तुलावी, ग्रामसेवक नेवारे आदीसह ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी गावात शांतता ठेवण्याचे आवाहन भाषणातून केले. (वार्ताहर)४सभेपूर्वी रांगीवासीयांच्या वतीने सोमवारी सकाळी गावातून फेरी काढून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेचा निषेध करण्यात आला. या फेरीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लिसिट हायस्कूल, शासकीय आश्रमशाळा, हरीजी विठूजी हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच गावातील नागरिक सहभागी झाले होते. फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी नारेबाजी करून पुतळा विटंबना घटनेचा निषेध केला.
राष्ट्रसंतांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध
By admin | Published: August 04, 2015 1:02 AM