लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरातील भटपार, हिंदेवाडा, इरपनार, धोडराज, पिटेकसा, राणीपोदूर, दरबा आदी गावांमधील नागरिकांनी एकत्र येत धोडराज येथील मुख्य चौकातून जनआक्रोश रॅली काढली. या रॅलीमध्ये नक्षल्यांच्या कृत्यांचा विरोध केला.नक्षलवाद्यांनी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षल सप्ताहाचे आयोजन केले आहे. नक्षल सप्ताहानिमित्त गावात बंद पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र नक्षल्यांच्या या आवाहनाचा दुर्गम भागातील नागरिकांनी विरोध केला आहे.
नक्षलवाद्यांसाठी आम्ही आमची कामधंदे का बंद ठेवायचे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. दुर्गम भागातील नागरिकांना नक्षलवादी बंदुकीचा धाक दाखवतात. स्वत:च्या फायद्यासाठी नागरिकांचा वापर केला जाते. नक्षलवाद्यांमुळेच आपल्या भागाचा विकास रखडला आहे. नक्षलवाद्यांनी इरपनार येथील उच्च शिक्षीत आदिवासी विद्यार्थिनी बेबी मडावी व मुन्सी ताडो यांची हत्या केली. नक्षलवादी स्वत:च्या हितासाठी आदिवासींची हत्या करण्यासही मागेपुढे पाहत नाही. नक्षलवाद्यांच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी रॅली काढण्यात आली. धोडराज येथील मुख्य चौकात बेबी मडावीच्या स्मारकाला श्रध्दांजली अर्पण केले. तसेच नक्षलवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. जनआक्रोश रॅलीत नक्षलवाद्यांविरोधात घोषणा देण्यात आल्या.
धोडराजचा परिसर नक्षलप्रभावित मानला जाते. दोन वर्षांपूर्वी पर्यंत नक्षलवाद्यांविरोधात ब्र काढण्याची हिंमत गावकरी करीत नव्हते. यावर्षी मात्र नक्षलवाद्यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. यावरून नक्षलवाद्यांविरोधात सामान्य नागरिकांमध्ये किती मोठा संताप आहे, हे दिसून येते. तसेच नक्षलवाद्यांची दहशत कमी झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.