गडचिरोली : काेरोनाचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी तब्बल दीड महिन्यापासून ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंध लागू आहेत. अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता अन्य सर्व व्यापार बंद आहेत. सरकारचे नियम राज्यातील सुमारे १५ हजार मोबाइल रिटेलर्सने पाळून व्यवहार बंद ठेवले आहेत; परंतु या काळात विदेशी ई-कॉमर्स कंपन्या (फ्लिपकार्ट व ॲमेझॅान) शासनाच्या नियमांना बगल देत सर्रास इतर वस्तू ऑनलाइन उपलब्ध करीत आहेत. या नियमबाह्य प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
ऑनलाइन बैठकीत असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष कैलाश लखयानी, राष्ट्रीय अध्यक्ष अरविंदर खुराणा, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष विभुती प्रसाद, राष्ट्रीय सरचिटणीस भावेश सोळंकी, सहसचिव नवनीत पाठक, असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप, राज्य सरचिटणीस जुझेर ढोरजीवाला आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी चर्चेत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेल्या विविध मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्यात सर्वच घटकांचे जलद लसीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, तसेच व्यापारी वर्गाला दिलासा देणारे निर्णय घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.