पावसासाठी वैरागडवासीयांचे भंडारेश्वराला साकडे
By admin | Published: August 4, 2015 12:59 AM2015-08-04T00:59:00+5:302015-08-04T00:59:00+5:30
गेल्या २०-२५ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर
वैरागड : गेल्या २०-२५ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे पावसाच्या आगमनासाठी आता सारेच जण ईश्वराची करूणा भाकत आहे. याचाच एक भाग म्हणून वैरागडवासीयांनी सोमवारी येथील भंडारेश्वर मंदिरात भजनाच्या निनादात पूजा-अर्चा करून देवाला पावसाच्या आगमनाचे साकडे घातले. दरम्यान वरूणदेवानेही नागरिकांचे आर्त हाक ऐकत कृपादृष्टी दाखविली. परिणामी पाऊस झाल्याने मंदिरात आलेल्या गावकरी ओले होऊन घरी परतले.
गेल्या २०-२५ दिवसांपासून वैरागड परिसरासह जिल्ह्यात दमदार पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांचे शेतजमिनीतील धानाचे पऱ्हे करपायला लागले आहेत. तसेच अनेक भागातील रोवणीचे काम खोळंबले आहे. परिणामी पऱ्हे टाकण्यापासून तर आतापर्यंतच्या शेतीमशागतीचा खर्च कसा भरून काढायचा, या विवंचनेत जिल्हाभरातील शेतकरी सापडला आहे. निसर्गाची अवकृपा होत असल्याचे पाहून वैरागड परिसरातील शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त झाले. त्यामुळे आता भंडारेश्वराची करूणा भाकायची, असा निर्धार वैरागडवासीयांनी केला. ठरल्याप्रमाणे सोमवारी सकाळपासून वैरागडातील सर्व नागरिक भंडारेश्वर मंदिरात एकत्र जमले. ढोलकी व टाळ, मृदंगाच्या निनादात भजन करून पावसाच्या आगमनाची करूणा भाकण्यात आली. भंडारेश्वर मंदिरात सकाळी ९ वाजतापासून ते दुपारी १२ वाजतापर्यंत धार्मिक विधी चालला. आरती झाल्यानंतर महाप्रसाद वितरित करण्यात आले. यावेळी ग्रा.पं. पदाधिकारी, भंडारेश्वर देवस्थानचे पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
भंडारेश्वराचा जलाभिषेक; दुकानेही बंद
भंडारेश्वर मंदिर परिसरात जमलेल्या पुरूष महिलांनी नजीकच्या खोब्रागडी नदीपात्रातील पाणी आणून भंडारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंगाचे जलाभिषेक केले. मनोभावे पूजा-अर्चा करून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हावा, अशी प्राथना केली.
पावसाने दीर्घ कालावधीपासून उसंत घेतल्यामुळे वैरागडसह जिल्हाभरातील शेतकरी कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे. शेतीत उत्पादन झाले नाही तर त्याचा इतर व्यवसायावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे वैरागडवासीयांनी सोमवारी नियोजित केलेल्या भंडारेश्वर पूजा-अर्चेच्या कार्यक्रमादरम्यान गावातील सर्व व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कार्यक्रमात सहभाग दर्शविला.