कुलगुरु हटाव, विद्यापीठ बचाव... संघटनांची जोरदार घोषणाबाजी, भरपावसात मोर्चा
By संजय तिपाले | Published: August 19, 2023 01:51 PM2023-08-19T13:51:22+5:302023-08-19T13:53:37+5:30
कडेकोट बंदोबस्तात पं.दीनदयाळ अध्यासनाचे उद्घाटन
गडचिरोली : कुलगुरु बोकारे हटाव, विद्यापीठ बचाव... नही चलेगी, नही चलेगी.. तानाशाही नही चलेगी... पं. दीनदयाळ उपाध्याय अध्यासन केंद्र रद्द झालेच पाहिजे... अशी घोषणाबाजी करत १९ ऑगस्टला आदिवासी व बीआरएसपी संघटनेच्या वतीने भरपावसात गोंडवाना विद्यापीठावर मोर्चा काढला. दुसरीकडे कडेकोट बंदोबस्तात विद्यापीठ प्रशासनाने पं. दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानववाद या अध्यासनाचा उद्घाटन कार्यक्रम उरकला.
गोंडवाना विद्यापीठात पं. दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानववाद या अध्यासनाला आदिवासी संघटनांनी कडाडून विरोध केला होता. या विरोधानंतरही १९ ऑगस्टला नियोजित कार्यक्रम होईल अशी भूमिका विद्यापीठ प्रशासनाने घेतली होती. दरम्यान, सकाळी ११ वाजता विद्यापीठात अध्यासनाचे उद्घाटन झाले. उद्घाटन कार्यक्रमानंतर आदिवासी युवा परिषद व बीआरएसपी या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मोर्चा विद्यापीठावर धडकला. यावेळी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्यासह अधिसभा पदाधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करुन रोष व्यक्त करण्यात आला. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चात अबालवृध्दांसह महिलांचाही लक्षणीय सहभाग होता.
भाजप, अभाविप पदाधिकाऱ्यांची गर्दी
या कार्यक्रमाला पत्रिका असलेल्यांनाच प्रवेश राहील, असा फतवा कुलगुरुंनी काढला होता. कार्यक्रमस्थळी मात्र, भाजप व अभाविप पदाधिकाऱ्यांची गर्दी दिसून आली. विद्यापीठ सर्वांसाठी खुले असल्याचा दावा पत्रकातून करणाऱ्या कुलगुरुंनी या कार्यक्रमात इतरांना डावलून भाजप व समविचारी संघटनांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
प्रेक्षकांपेक्षा बंदोबस्ताला पोलिस अधिक
दरम्यान, आदिवासी संघटनांनी विरोध केल्यामुळे विद्यापीठ प्रशासन धास्तावले होते. अगदी न्यायालय रस्त्यापासून ते विद्यापीठापर्यंत तीनवेळा तपासणी करुन नागरिकांना सोडले जात होते. मुख्य प्रवेशद्वार बंद होते, बाजूच्या प्रवेशद्वारावर पत्रिका असलेल्यांनाच पोलिस प्रवेश देत होते. अध्यासनाच्या उद्घाटनाला शंभर जण उपस्थित होते, बाहेर तेवढेच पोलिस बंदोबस्ताला होते.
संघविचार लादण्याचा खटाटोप
गडचिरोली जिल्ह्याच्या सांस्कृतिक व शैक्षणिक इतिहासाशी पं. दीनदयाल उपाध्याय यांचा काडीचाही संबंध नाही, त्यांचे कुठले योगदान नाही, पण त्यांच्या नावाने गोंडवाना विद्यापीठात अध्यान केंद्र सुरु करुन विद्यापीठ प्रशासनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार लादण्याचा खटाटोप केला आहे. मात्र, हे कदापि खपवून घेणार नाही. विद्यापीठ आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी आहे, तेथे अशा प्रकारचे छुपे अजेंडे चालणार नाहीत, यास आमचा कायम विरोध राहील.
- रोहिदास राऊत, आंदोलक