अहेरी तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर महागाव हे गाव आहे. महागाव परिसरातील नागरिकांना विविध कामे करण्यासाठी अहेरी येथे जावे लागते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने ६ किमीचे अंतर पार करण्याकरिता अर्धा तास लागताे. महागाव - अहेरी मार्गाचे नूतनीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. परंतु या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. काही वर्षांपूर्वी या मार्गाचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र, त्यानंतर रस्त्याची केवळ डागडुजी झाली. पक्की दुरुस्ती झाली नाही. महागाव मार्गावरून छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून अवजड वाहतूक केली जात आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले. मात्र, अद्याप त्यांची डागडुजी झाली नाही. परिसरात १० गावांचा समावेश आहे. अनेक रस्त्यांचे ५ ते ६ वर्षांपूर्वी बांधकाम झाले तर काही रस्त्यांची निर्मिती १० वर्षांपूर्वी झाली. दरवर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था हाेते. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महागाव परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:35 AM