गडचिराेली : इतर नागरिकांना आराेग्य सेवा देताना अनेक आराेग्य कर्मचारी काेराेनाबाधित हाेत आहेत. त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबासाठी शासकीय रुग्णालयातील १० टक्के बेड व औषधसाठा आरक्षित ठेवावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आराेग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
काेराेना महामारीचे संकट सुरू आहे. प्रत्येकाने घरीच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. अशाही परिस्थितीत आराेग्य कर्मचारी मात्र काेराेना रुग्णांची सेवा करण्यात व्यस्त आहेत. रुग्णांना सेवा देतानाच आराेग्य कर्मचाऱ्यांनाही काेराेनाची बाधा हाेत आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बेड मिळत नाही. औषधाेपचारही हाेत नाही.
आराेग्य कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी १० टक्के रेमडेसिविर इंजेक्शन, बेड व इतर औषधासाठा आरक्षित ठेवावा. आराेग्य कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा काढावा. कंन्टेन्मेंट झाेनमध्ये आराेग्य कर्मचाऱ्यांना एकटे पाठवू नये. त्याला पाेलीस संरक्षण द्यावे. काेविड-१९ मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जाेखीम भत्ता द्यावा, मास्क, सॅनिटायझर, ग्लाेव्हज, ऑक्सिमीटर, टेम्परेचर मीटर उपलब्ध करून द्यावे. रॅक टेस्ट व काेविड लसीकरण टीमला अतिरिक्त मानधन द्यावे. आराेग्य कर्मचाऱ्यांचे दर महिन्याच्या ५ तारखेला वेतन करावे आदी मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हा आराेग्य अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी संघटनेचे काेषाध्यक्ष अनिल मंगर, आनंद माेडक उपस्थित हाेते.