विद्युत खांबामुळे अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:00 AM2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:01:18+5:30
यावर्षी आरमोरी टी-पार्इंट ते ब्रह्मपुरी-नागभिड दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. सदर राष्ट्रीय महामार्गात जुन्या रूंद राज्य महामार्गावर विद्युत खांब कडेला होते. नव्याने करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाची रूंदी वाढविण्यात आली. त्यामुळे आरमोरी शहरातून जाणाऱ्या मार्गावरील अनेक वीज खांब व डीपी रस्त्यावर आली. वीज वितरण कंपनीने रस्त्यावरील विद्युत खांब व डीपी इतरत्र हलविली नाही.
विलास चिलबुले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने आरमोरी-ब्रम्हपुरी या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. सदर रस्त्याचे काम कंत्राटदारामार्फत करण्यात आले. मात्र रस्त्यावर असलेली विद्युत डीपी व खांब तसेच जुन्याच ठिकाणी कायम ठेवण्यात आले. या वीज डीपी व खांबामुळे आरमोरी येथील जीवानी राईसमिल समोर मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
यावर्षी आरमोरी टी-पार्इंट ते ब्रह्मपुरी-नागभिड दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. सदर राष्ट्रीय महामार्गात जुन्या रूंद राज्य महामार्गावर विद्युत खांब कडेला होते. नव्याने करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाची रूंदी वाढविण्यात आली. त्यामुळे आरमोरी शहरातून जाणाऱ्या मार्गावरील अनेक वीज खांब व डीपी रस्त्यावर आली. वीज वितरण कंपनीने रस्त्यावरील विद्युत खांब व डीपी इतरत्र हलविली नाही. सदर राष्ट्रीय महामार्गाचे काम फेब्रुवारी महिन्यात कंत्राटदारामार्फत करण्यात आले. त्यानंतर कोरोनाच्या संचारबंदीमुळे वाहतूक ठप्प पडली. कोरोनामुळे सध्या या मार्गावरील वाहनांची वर्दळ कमी आहे. मात्र येत्या काही दिवसानंतर कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यावर सदर मार्गावरील वाहतूक वाढणार आहे. दरम्यान येथून अवजड वाहतूक होते.
अशा परिस्थितीत जीवानी राईसमिल समोर असलेल्या विद्युत डीपीमुळे तसेच हितकारणी शाळेजवळील आलेल्या खांबामुळे वाहनाची धडक बसून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या असतानाही या गंभीर समस्येकडे नगर परिषद, वीज वितरण कंपनी व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रात्रीच्या सुमारास वाहनाच्या अंधुक प्रकाशात रस्त्यावरील हे वीज डीपी व खांब स्पष्ट दिसत नाही. वाहनचालकाचे नियंत्रण सुटून वीज खांब डीपीला जोरदार धडक बसून हानी होण्याची शक्यता आहे. शहरातून जाणाºया मुख्य मार्गावर मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासनाला आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. अपघात झाल्यानंतरच वीज डीपी व खांब हटवतील का, असा प्रश्न आहे.
१५ विद्युत खांब अद्याप रस्त्यावर
आरमोरी येथील मुख्य मार्गावर वडसा टी पार्इंट ते साई मंदिरपर्यंत जवळपास १५ विद्युत खांब रस्त्यावर आहेत. जुना रस्ता अरूंद होता. मात्र राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यावर रस्त्याची रूंदी वाढली. परिणामी जुने वीज खांब त्याच ठिकाणी कायम ठेवण्यात आले. आता हे वीज खांब रस्त्याच्या मधोमध दिसत आहेत. नवीन बसस्थानक, पंचायत समितीजवळ, भगतसिंह चौक, जुना बसस्थानक, इंदिरा गांधी चौक, नाका व साई मंदिर परिसरात मुख्य रस्त्यावर विद्युत खांब आलेले आहेत. वडसा टी पार्इंटपासून साई मंदिर दरम्यान कुठेही या वीज खांबामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. मात्र या समस्येकडे नगर परिषद व महावितरण दुर्लक्ष करीत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गाचे काम कंत्राटदाराकडे सोपविले. रस्ता बांधकामादरम्यान रस्त्यावरील वीजेचे खांब व डीपी इतरत्र हलविण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची होती. मात्र त्याने ते हलविण्याकडे दुर्लक्ष केले.
- आशिष बोरकर, अभियंता, वीज वितरण कंपनी, आरमोरी