लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असल्याने हवामानात आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे धानावर करपा व कडाकरपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी धानाची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र सोनापूरच्या वतीने करण्यात आले आहे. विविध पिकांची कशी काळजी घ्यावी, याबाबत सल्ला दिला आहे.धानावर करपा व कडाकरपा या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास धानावर कॉपर ऑझिक्लोरिड २५ ग्रॅम व स्टेपटोसाक्लिन ०.५ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून पाऊस नसलेल्या दिवशी फवारणी करावी. लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायक्लोरोव्हास ७६ ईसी १२.५० मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाने गुंडाळणारी अळी, बेरड, सुरळीतील अळी, सिंगअळीच्या व्यवस्थापनासाठी बिव्हेरिया बेसियाना १.१५ टक्के २.५ किलो प्रती हेक्टरी किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही २५ मिली किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही २५ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.तूर पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी १५ दिवसांच्या नंतर करावी. कापूस पिकावर पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी बुप्रोफेझीन २५ एसी २० मिली किंवा प्लोनिककमाईड ५० टक्के डब्ल्यूजी ३ ग्रॅम किंवा पायरीप्रॉझिफेन ५ टक्के इसी फेन्प्रोप्याथ्रीन १५ ईसी १० मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची पिकावरील फूल पोखणाऱ्या अळीच्या व्यस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त कळ्या, फुले ताबोडतोब गोळा करून नष्ट करावे व या किडीच्या व्यवस्थापनासाठी डेल्टा मेथ्रीन २.८ टक्के प्रवाही १० मिली किंवा इम्यामेक्टीन बेंझोेएट ५ टक्के विद्रावे दाणेदार ४ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा बियाण्यास रायझोबियम जापोनिकम प्रती १० किलो बियाणांना २५० ग्रॅम प्रमाणे बिज प्रक्रिया करून पेरणी करावी. जातीवंत बियाणे वापरावे. पेरणी ३० बाय १० सेंटीमीटरच्या अंतराने करावी, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने देण्यात आला आहे. रोगांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी वेळोवेळी पिकांची पाहणी करीत राहणे गरजेचे झाले आहे.पेरणीसाठी प्रति हेक्टरी १५ ते २० किलो मका आवश्यकज्या शेतकऱ्यांकडे रबी हंगामात सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी मका पिकाची लागवड करतात. दिवसेंदिवस मका पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मक्याची पेरणी आॅक्टोबर महिन्याच्या शेवटीपर्यंत उरकून घेणे आवश्यक आहे. मक्याची पेरणी करताना प्रती हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे. बियाणांना थायरम लावून बिज प्रक्रिया करावी. दुभत्या जनावरांना आहार व्यवस्थापनासाठी हिरवा चारा व एक टक्क खनिज मिश्रणाचा समावेश करावा. आवश्यकतेनुसार मिठ टाकावे. वेळोवेळी लसीकरण करावे. शेळ्यांना घटसर्प प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पशुवैद्यकीय अधिकाºयांचा सल्ला घ्यावा. पावसामध्ये दुभत्या जनावरांची प्रकृती बिघडण्याची शक्यता राहत असल्याने या कालावधीत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.६ नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता६ नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. अधूनमधून जिल्ह्यात मेघ गर्जनेसह पाऊस पडत आहे. सातत्याने पाऊस पडत असल्याने नागरिकही कमालीचे त्रस्त झाले आहेत. पावसामुळे धानाच्या कापणीची कामे रखडली आहेत. मागील तीन महिन्यांपासून काही दिवसांच्या अंतराने सतत पाऊस कोसळत असल्याने धानपिकाला यावर्षी पाण्याची गरज निर्माण झाली नाही. मात्र धानपीक आता परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना मुसळधार पाऊस कोेसळत असल्याने धान कोसळून जमिनीवर पडत आहे. त्यामुळे धानाच्या उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता आहे.
ढगाळ वातावरणाने धानावर करपा व कडाकरपा रोगांचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 6:00 AM
धानावर करपा व कडाकरपा या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास धानावर कॉपर ऑझिक्लोरिड २५ ग्रॅम व स्टेपटोसाक्लिन ०.५ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून पाऊस नसलेल्या दिवशी फवारणी करावी. लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायक्लोरोव्हास ७६ ईसी १२.५० मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ठळक मुद्देसंडे अँकर । औषधांची फवारणी करण्याचा कृषी विभागाचा सल्ला; वेळोवेळी पिकांचे निरीक्षण करण्याची गरज