पथदिव्यांचे 134 काेटी रुपये वीजबिल थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 05:00 AM2021-07-26T05:00:00+5:302021-07-26T05:00:31+5:30
या वर्षी मे महिन्यात राज्य शासनाने एक परिपत्रक जाहीर केले. त्यात वीजबिलाचा भरणा ग्रामपंचायतींनी १५व्या वित्त आयाेगाच्या निधीतून करावा, असे निर्देश दिले. मात्र काही ग्रामपंचायतींचा १५व्या वित्त आयाेगाच्या निधीपेक्षाही पथदिव्यांच्या वीजबिलाची रक्कम अधिक आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी वीजबिल भरले नाही. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे १२ महिने व जुलैपर्यंतचे चार महिने असे एकूण १६ महिन्यांचे बील थकले आहे. बिलाची रक्कम सुमारे १३४ काेटी ३१ लाख रुपये एवढी आहे.
दिगांबर जवादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : गावातील पथदिव्यांचे सुमारे १३४ काेटी ३१ लाख रुपयांचे वीजबिल थकले असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे. घरगुती ग्राहकांकडेही सुमारे १५ काेटी रुपयांचे वीजबिल थकले आहे. या ग्राहकांना वीजबिलाचा पुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणमार्फत दिला जात आहे.
दरवर्षी गावांमधील पथदिव्यांचे वीजबिल शासनामार्फत भरले जात हाेते. ग्रामपंचायती पंचायत समितीकडे वीजबिल सादर करीत हाेते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मार्फत शासनाकडे वीजबिल पाठविले जात हाेते. शासनाकडूनच वीजबिल भरले जात असल्याने पथदिव्यांच्या वीजबिलाचा त्रास ग्रामपंचायतीला राहत नव्हता. मात्र या वर्षी मे महिन्यात राज्य शासनाने एक परिपत्रक जाहीर केले. त्यात वीजबिलाचा भरणा ग्रामपंचायतींनी १५व्या वित्त आयाेगाच्या निधीतून करावा, असे निर्देश दिले. मात्र काही ग्रामपंचायतींचा १५व्या वित्त आयाेगाच्या निधीपेक्षाही पथदिव्यांच्या वीजबिलाची रक्कम अधिक आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी वीजबिल भरले नाही. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे १२ महिने व जुलैपर्यंतचे चार महिने असे एकूण १६ महिन्यांचे बील थकले आहे. बिलाची रक्कम सुमारे १३४ काेटी ३१ लाख रुपये एवढी आहे.
वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम सुरू
ज्या घरगुती, व्यावसायिक, औद्याेगिक ग्राहकांनी मागील तीन ते चार महिन्यांपासून वीजबिलाचा भरणा केला नाही, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम महावितरणने हाती घेतली आहे. काही ग्रामपंचायतींचाही वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
शासनाने मागितली पथदिव्यांची बिले
राज्य शासनाने मे महिन्यात काढलेल्या परिपत्रकानुसार पथदिव्यांचे वीजबिल १५व्या वित्त आयाेगाच्या निधीतून भरायचे हाेते. मात्र काही ग्रामपंचायतींना १५व्या वित्त आयाेगातून मिळणाऱ्या अनुदानापेक्षाही वीजबिलाची रक्कम अधिक हाेती. तसेच संपूर्ण रक्कम वीजबिलावरच खर्च झाल्यास उर्वरित कामांसाठी ग्रामपंचायतीकडे अनुदानच राहणार नाही, ही बाब शासनाच्या लक्षात आली. शासनाने पुन्हा पंचायत समितींमार्फत वीजबिले मागण्यास सुरुवात केली.
घरगुती ग्राहकांकडे १५ काेटी थकले
- गडचिराेली जिल्ह्यात २ लाख ६ हजार ७७३ घरगुती वीजग्राहक आहेत. या ग्राहकांकडून महिन्याला जवळपास १३ काेटी रुपयांची वीज खर्च केली जाते. काेराेनाच्या कालावधीत काही नागरिकांनी वीजबिलाचा भरणा केला नाही. सुमारे १४ काेटी ५७ लाख रुपयांचे वीजबिल या ग्राहकांकडे थकले आहे.
- व्यावसायिक ग्राहकांकडे २ काेटी ५० लाख, औद्याेगिक ग्राहकांकडे २ काेटी २९ लाख, सार्वजनिक सेवेच्या ग्राहकांकडे ३ काेटी ८७ लाख रुपयांची रक्कम थकली आहे. सर्व मिळून जवळपास २५ काेटी रुपयांची रक्कम थकली असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे.