केअर सेंटरची एसडीओंनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:46 AM2021-04-30T04:46:29+5:302021-04-30T04:46:29+5:30
धानोरा : सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर यांनी २८ एप्रिल रोजी धानोरा व सोडे येथील ...
धानोरा : सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर यांनी २८ एप्रिल रोजी धानोरा व सोडे येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील समस्या व सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी रुग्ण व कर्मचाऱ्यांशी चर्चाही केली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत धानोरा येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह व मुलींचे वसतिगृह तसेच सोडे आश्रमशाळेतील वसतिगृह येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. परंतु, रुग्णसंख्या कमी झाल्याने ही सेंटर बंद करण्यात आली हाेती. त्यानंतर दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत गेल्याने ७ एप्रिल रोजी धानोरा येथे व २४ एप्रिलला सोडे येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. सध्या मुलींच्या वसतिगृहात २२ रुग्ण, मुलांच्या वसतिगृहात २१ रुग्ण व सोडे येथे १५ रुग्ण असे एकूण ५६ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. उपविभागीय अधिकारी अशिष येरेकर यांनी रुग्णांची प्रकृतीबाबत विचारपूस केली. यावेळी रुग्णांनी जेवणामध्ये फक्त दोन पोळी व थोडासा भात, भाजी मिळते. तेवढे अन्न पुरेसे नाही तसेच फळे व अंडेसुद्धा दिले जात नाही, अशी कैफियत मांडली. रुग्णांना वाफारा घेण्यासाठी वाफारा मशीन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रुग्णांनी केली. यावर अधिकाऱ्यांना येरेकर यांनी योग्य निर्देश दिले. यावेळी तहसीलदार सीजी पित्तूलवार, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे, पुरवठा निरीक्षक चंदू प्रधान व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
===Photopath===
290421\29gad_1_29042021_30.jpg
===Caption===
काेविड केअर सेंटरची पाहणी करताना एसडीओ आशिष येरेकर.