विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:10 PM2019-06-17T23:10:23+5:302019-06-17T23:10:37+5:30
सर्व वाहनचालकांसह परिवहन विभाग व इतर संबंधितांनी विद्यार्थ्यांची शाळेपर्यंतची वाहतूक सुरक्षितरित्या होण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित झाली पाहिजे. त्यासाठी वाहतूक नियमाचे काटेकोर पालन करा, असे निर्देश अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.हरी बालाजी यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सर्व वाहनचालकांसह परिवहन विभाग व इतर संबंधितांनी विद्यार्थ्यांची शाळेपर्यंतची वाहतूक सुरक्षितरित्या होण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित झाली पाहिजे. त्यासाठी वाहतूक नियमाचे काटेकोर पालन करा, असे निर्देश अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.हरी बालाजी यांनी दिले.
जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक १७ जून रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी सदर समितीचे अध्यक्ष म्हणून पोलीस अधीक्षकांच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.बालाजी बोलत होते. यावेळी बैठकीला प्रामुख्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश उचे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) मनोहर चलाख व इतर अधिकारी उपस्थित होते.
महाराष्टÑ मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम नियम) २०११ चे नियम ५ (२) च्या तरतुदीनुसार प्रत्येक शाळेमध्ये मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्या अध्यक्षतेखाली स्कूल बस परिवहन समिती गठित करावयाची आहे. तसे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिकेवर निकाल देताना आदेशही दिले आहे. त्यामुळे या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांनी परिवहन समितीचे गठन करून या समितीच्या नियमित बैठका घ्याव्यात, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.बालाजी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. ही कार्यवाही प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी करावी, अशा सूचना केल्या.
योग्यता प्रमाणपत्र समाप्त झालेल्या स्कूल बसेसची तपासणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कूलबसेस व व्हॅनची उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून तपासणी करून घ्यावी. योग्यता प्रमाणपत्र समाप्त झालेल्या स्कूलबसची पुनर्रतपासणी न केल्यास या बसने वाहतूक करता येणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या. जे स्कूलबस चालक व मालक योग्यता प्रमाणपत्र समाप्त झालेल्या स्कूलबसेसची तपासणी करून नवे प्रमाणपत्र मिळविणार नाही, अशा स्कूल व्हॅन व बसेसवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.
सदर बैठकीत आगामी शैक्षणिक सत्रात शाळेचे अंतर, स्कूलबस व व्हॅनने विद्यार्थ्यांची होणारी वाहतूक, संबंधित शाळांची वाहतुकीसाठीची मान्यता व आरटीओची वाहतुकीला मान्यता आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. याबैठकीला परिवहन, शिक्षण व पोलीस विभागाचे वाहतूक कर्मचारी उपस्थित होते.