स्वयंप्रेरणेने तरुणांनी आखला यशाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:42 PM2018-12-13T23:42:43+5:302018-12-13T23:44:31+5:30

बारा वर्षांपूर्वी तालुक्यातील कुरूड गावच्या तरुणांनी गावात कसल्याही सुविधा नसतांना आरडाओरड केली नाही. फक्त उमेद, समध्येयाने प्रेरित मित्रांची एकी या बळावर वडसा ते आरमोरी रोडबाजूच्या जेजाणी पेपरमिल जवळील मोकळ्या जागेवर शारीरिक व्यायाम करण्यासाठी स्वखर्चाने तात्पुरती धावपट्टी, गोळाफेक, उंच उडी टाकी तयार केली.

Self-help is the way to success in youth | स्वयंप्रेरणेने तरुणांनी आखला यशाचा मार्ग

स्वयंप्रेरणेने तरुणांनी आखला यशाचा मार्ग

Next
ठळक मुद्देसरावासाठी तयार केले मैैदान : १२ वर्षात अनेकजण परिश्रमाने दाखल झाले पोलीस व सैैन्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा/तुळशी : बारा वर्षांपूर्वी तालुक्यातील कुरूड गावच्या तरुणांनी गावात कसल्याही सुविधा नसतांना आरडाओरड केली नाही. फक्त उमेद, समध्येयाने प्रेरित मित्रांची एकी या बळावर वडसा ते आरमोरी रोडबाजूच्या जेजाणी पेपरमिल जवळील मोकळ्या जागेवर शारीरिक व्यायाम करण्यासाठी स्वखर्चाने तात्पुरती धावपट्टी, गोळाफेक, उंच उडी टाकी तयार केली. आणि बघताबघता बारा वर्षात एक तरुणी आणि चौदा तरुण असे पंधरा तरुण आर्मी, पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफमध्ये रुजू होऊन देशसेवा करीत आहेत.
आजतागायत कुरूड, जुनी वडसा, नैनपूर आणि शिवराजपूर येथील २० ते २५ मुले-मुली दररोज सकाळ-सायंकाळ याठिकाणी सरावासाठी येतात आणि झपाटल्यागत धावतात. विशेष म्हणजे, एक विवाहित तरुणी माहेरवाशीण बनून येथे शारीरिक सराव करीत आहे.
२००६-२००७ मध्ये कुरूड, जुनी वडसा, नैनपूर आणि शिवराजपूर येथील काही जिद्दी मुलांनी स्वत:च आपल्या सवंगड्यांना सोबत घेत ध्येय ठरवले की आपण स्वस्थ न बसता देशसेवा करायला सैन्यात दाखल व्हायचे. ध्येय सुनिश्चित झाले परंतु ज्या उर्मीने, उमेदीने ही मुले एकत्र आली. त्यांच्या समोर खरी अडचण होती ती शारीरिक सरावासाठीच्या जागेची, साहित्याची आणि मार्गदर्शनाची. या चार गावात यातील काहीच उपलब्ध नव्हते. हे तरुण हार न मानणारे होते. अखेर समर्पित आणि प्रामाणिकपणे ध्येयासाठी पावले टाकल्यावर आपसूकच सारी अडथळे दूर होतात अगदी तसेच या मुलांना शोध लागला तो जेजाणी पेपरमिल जवळील पडीक मोकळ्या जागेचा. मुरमाळ जमीन असली तरी विस्तीर्ण सपाट पट्टा असल्याने मुलांनी येथे सराव सुरू केला. या सळसळत्या रक्ताच्या मुलांनी शरीराचे पाणी-पाणी करून घाम घाळला. घामाला फळ आले. आजपर्यंत आर्मीत विंकल गोडेस्वार, विक्की हुमणे, संतोष राऊत, सीआरपीएफ मध्ये आकाश ठाकरे, बीएसएफमध्ये अभय हुमणे, पोलीस खात्यात देवराव केळझळकर, नरेश उरकुडे (पीएसआय), नितेश झूरे, प्रशांत नाकतोडे, राकेश गणवीर, छंदक रामटेके, अरूण मेश्राम, अनिल ढोरे, लता भूरले, नंदू झूरे आणि शहीद झालेल्या दुर्योधन नाकतोडे यांचा समावेश होता.
सद्यस्थितीत शंभर मीटर, चारशे मीटर, बाराशे मीटर अंतराची धावपट्टी, लांब उडी खड्डा, पुश अप खांब तयार केलेले आहेत. याकरिता वीस-पंचवीस मुला-मुलींनी वर्गणी काढून साहित्याची जुळवाजुळव केली. मुलांसमोर अनेकानेक अडचणी असून गावात व्यायामशाळा, वाचनालय निर्माण करण्याची मागणी सदर ध्येयासक्त तरुणांनी केली आहे.

Web Title: Self-help is the way to success in youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.