पेरमिली : पेरमिली गावच्या मामा मालगुजारी तलावात मोठा मगर अचानकपणे आल्यामुळे संपूर्ण गाव परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. वन विभागाने या तलावावर गावकऱ्यांनी तसेच जनावरांना जाऊ देऊ नये म्हणून फलक लावला आहे.भामरागड-आलापल्ली मार्गावर अहेरी तालुक्यात पेरमिली हे मोठी ग्रामपंचायत आहे. या गावात मोठा मालगुजारी तलाव असून या तलावात महिला कपडे धुणे तसेच शेतकरी व नागरिक जनावरे व पाळीव प्राणी धुण्यासाठी नेहमीच नेत असतात. या पाण्याचा शेतीसिंचनासाठीही परिसरातील नागरिक वापर करतात. पावसाळ्यात या तलावाला बऱ्यापैकी पाणीही आलेले आहे. पाण्यासोबत मोठा मगरही आला असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यानंतर तत्काळ याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाचे वन परिक्षेत्राधिकारी पेंदाम यांनी तत्काळ तलाव व गाव परिसरात बॅनर लावला आहे. या परिसरात पाळीव प्राणी, जनावरे सोडू नये. तसेच महिलांनी कपडे धुण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन केले आहे. तलाव परिसरात जाण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहे. मगरीचा बंदोबस्त वन विभागाने तत्काळ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वीही गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्याच्या वैरागड भागात पावसाळ्याच्या काळात मगर वाहत आला होता. त्यानंतर वन विभागाने तो मगर पकडून त्याला चंद्रपूर जिल्ह्यात नेऊन सोडले होते. असाच प्रकार येथेही झाला असावा, अशी शक्यता आहे.(वार्ताहर)
पेरमिलीच्या तलावात मगर आढळल्याने खळबळ
By admin | Published: August 12, 2015 1:20 AM