भामरागड : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवासी भरण्यास बंदी असली, तरी भामरागड येथे या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. खासगी वाहनांमुळे एसटीला प्रवासी मिळणे कठीण झाले आहे.
आलापल्लीत फवारणी करण्याची मागणी
आलापल्ली : येथील अनेक वॉर्डातील नाल्यांचा गाळ उपसा करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नाल्यांमधून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी, वॉर्डात डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांमुळे शहरात आजाराचे प्रमाण वाढले आहे.
शेतीसाठी जागा द्या
गडचिरोली : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झुडपी जंगल आहे. या जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत. कमी जमिनीत यांत्रिकीकरण करणे शक्य होत नाही. त्यामुळे जागा उपलब्ध करावी.
निवासस्थान सक्तीचे करा
अहेरी : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र, शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने, कर्मचाऱ्यांच्या देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत. विविध विभागांचे कर्मचारी तालुका मुख्यालयी राहत नाही.
हातगाड्यांचे अतिक्रमण
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध विकत असतात. या दुकानासमोर उभे राहून अनेक नागरिक वस्तू खरेदी करतात. यामुळे वाहतूक प्रभावित होते. त्यामुळे अतिक्रमण काढावे, अशी मागणी हाेत असतानाही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
अहेरीत वाहतूक कोंडी
अहेरी : शहरातील बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर, या ठिकाणी येणारे ग्राहकही रस्त्याच्या बाजूलाच दुचाकी वाहने पार्किंग करतात. त्यामुळेही रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण हटवावे, अशी मागणी हाेत आहे.
काेपरअल्ली मार्ग खड्ड्यात
मुलचेरा : तालुक्यातील मुलचेरा ते मार्कंडा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व नागरिकांना करावा लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.