अर्धवट नालीमुळे भूखंडावर सांडपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 05:00 AM2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:01:07+5:30
कन्नमवार नगरात तसेच विवेकानंद नगराच्या बोडीच्या पाळीखाली अनेक नागरिकांचे भूखंड आहेत. या परिसरात अनेकांची घरे आहेत. याच परिसरात विनायक कोडापे यांचा भूखंड आहे. पश्चिम दिशेला दुसऱ्या एका व्यक्तीचा भूखंड आहे. दोन्ही भूखंड रिकामे असल्याने पावसाळ्यात चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयापासून पाणी वाहत येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरातील शासकीय विज्ञान महाविद्यालयापासून पावसाचे पाणी कन्नमवार नगरातील वॉर्ड क्रमांक २१ मध्ये वाहत होते. येथे एका ठिकाणी नालीचे अर्धवट बांधकाम झाल्याने मोकळ्या भूखंडामध्ये पावसाचे पाणी व सांडपाणी साचत असल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नगर परिषदेने अर्धवट नालीचा उतार विरूद्ध दिशेला वळवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कन्नमवार नगरात तसेच विवेकानंद नगराच्या बोडीच्या पाळीखाली अनेक नागरिकांचे भूखंड आहेत. या परिसरात अनेकांची घरे आहेत. याच परिसरात विनायक कोडापे यांचा भूखंड आहे. पश्चिम दिशेला दुसऱ्या एका व्यक्तीचा भूखंड आहे. दोन्ही भूखंड रिकामे असल्याने पावसाळ्यात चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयापासून पाणी वाहत येते. सदर पाणी रिकाम्या भूखंडांमध्ये साचते. विशेष म्हणजे, नगर परिषदेमार्फत पश्चिम दिशेला नालीचे बांधकाम करण्यात आले आहे. सदर नाली अर्धवट आहे. याशिवाय नालीचा उतार मोकळ्या भूखंडाच्या दिशेने असल्याने पावसाचे पाणी मोकळ्या भूखंडांमध्ये जमा होते. या परिसरात असणाºया नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. सदर समस्या स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. परंतु ही समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष झाले. नगर परिषदेने बांधलेली नाली अर्धवट असल्याने पाण्याचा निचरा न होता ते मोकळ्या भूखंडांमध्ये साचते. या भागात सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक प्रशासनाने अर्धवट नालीचा उतार विरूद्ध दिशेला वळवून नालीचे बांधकाम करावे, अशी मागणी विनायक कोडापे यांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच स्थानिक नगर सेवकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
डुकरांचा हैदोस
कन्नमवार नगरातील मोकळ्या भूखंडांवर सांडपाण्याची डबकी आहेत. या डबक्यांमध्ये दिवसभर डुकरे व मोकाट जनावरे हैदोस घालतात. परिणामी सांडपाण्याची दुर्गंधी पसरते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास होत असून रात्रीच्या सुमारास डासांच्या प्रकोपाला बळी पडावे लागते. विविध कीटकजन्य रोग या भागात पसरण्याची शक्यता आहे.