लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यात लाॅकडाऊनापासूनच अवैध रेती वाहतूक व विक्रीचा गाेरखधंदा सुरू हाेता. याबाबत महसूल प्रशासनाकडे अनेकांनी तक्रारीही केल्या हाेत्या. या तक्रारींची दखल महसूल विभागाने घेत महिनाभरापासून अवैध रेती खनन व वाहतूक विराेधात धडक कारवाई सुरू केल्याने तालुक्यात रेती मिळेनाशी झाली. सध्या संपूर्ण बांधकामे ठप्प पडली आहेत. मागील महिन्यापासून महसूल विभागाने शेकडाे ब्रास रेती जप्त केली. लाखाे रुपयांचा दंड आकारला. अवैध वाहतूक करणारी वाहणे जप्त करून गुन्हा दाखल केला. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे रेती मिळेनाशी झाली. परिणामी शहरातील शासकीय व खासगी बांधकामे ठप्प पडली आहेत. तसेच घरकुलांचीही कामे रेतीअभावी बंद आहेत. अनेकांनी नवीन घरकुलाचे बांधकाम रेतीअभावी सुरूच केले नाही. विशेष एटापल्लीपासून ४ किमी अंतरावरील आलदंडी नदीतून शहरात अवैध रेती माेठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात हाेती. मागील महिन्यात प्रथमच उपविभागीय मनाेज जिंदल, तहसीलदार अजयकुमार अष्टे यांनी शहरात फिरून शासकीय व खासगी कामांची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांना ज्या ठिकाणी अवैधरित्या रेती साठविलेली आढळून आली, तेथील रेती जप्त करण्याचे आदेश दिले. महसूल विभागाने सतत तीन दिवस कारवाई करून शहरातून शेकडाे ब्राॅस रेती जप्त करून तहसील कार्यालयासमाेर गाेळा केली. तसेच रेतीची साठवणूक करणाऱ्यांवर दंड ठाेठावून गुन्हा दाखल केला. व तस्करी करणाऱ्यांची वाहने जप्त केली. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैधरित्या रेतीची वाहतूक करण्याचे धाडस कुणीही करताना सध्या तरी दिसून येत नाही. बांधकामासाठी छत्तीसगड राज्यातून रेती आणणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बांधकामे ठप्प आहेत. तसेच बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांचाही राेजगार सध्या हिरावला आहे. त्यामुळे शासनाने लवकर रेती घाटांचे लिलाव करावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
दाेन विभागांच्या कचाट्यात रेती तस्करएटापल्ली तालुक्याच्या आलदंडी नदीतून उत्कृष्ट दर्जाची रेती दरवर्षी प्राप्त हाेते. परंतु यावर्षी रेती घाटांचा लिलाव न झाल्याने रेती मिळण्यास अडचणी येत आहेत. १५० किमी अंतरावरील छत्तीसगड राज्यातून रेती आणावी लागत आहे. अवैध रेती तस्कर आलदंडी नदीतून रेतीचा उपसा करण्यासही धजावत नसल्याचे सध्या दिसून येत आहे. आलदंडी नदी वनविभागाच्या हद्दीत असल्याने रेती उपसा करताना वनाधिकाऱ्यांची भीती तर वाहतूक करताना व साठवणूक केल्यानंतर महसूल विभागाच्या कारवाईची भीती अशा दाेन विभागाच्या कचाट्यात रेती तस्कर सापडले आहेत.