राष्ट्रीय महामार्गाला झुडपांचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:28 AM2019-05-09T00:28:07+5:302019-05-09T00:28:26+5:30
आरमोरी-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा अनेक लहान-मोठी झाडे आहेत. परंतु अनेक ठिकाणी बाजूची झुडपे रस्त्यावर आल्याने वळणाऱ्याला विरूद्ध दिशेने येणारे वाहन दिसत नाही. या मार्गावर अपघात होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाला झुडूपांचा वेढा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा अनेक लहान-मोठी झाडे आहेत. परंतु अनेक ठिकाणी बाजूची झुडपे रस्त्यावर आल्याने वळणाऱ्याला विरूद्ध दिशेने येणारे वाहन दिसत नाही. या मार्गावर अपघात होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाला झुडूपांचा वेढा आहे. त्यामुळे मार्गालगची झुडुपे तोडावी, अशी मागणी केली जात आहे.
आरमोरी-गडचिरोली महामार्गावर देऊळगाव, किटाळी, चुरमुरा गावालगत तसेच बाहेर विविध प्रजातींच्या झाडांची झुडपे दिसून येतात. विशेष म्हणजे सदर झुडपे गावालगतच्या रस्त्यावर असल्याने गावातील नागरिकांचेही या मार्गावरून आवागमन असते. विरूद्ध दिशेने येणारे वाहन दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरवर्षी झुडपांमुळे अनेक अपघात या गावांलगत घडत असतात. याशिवाय वसा, पोर्ला, मोहझरी, काटली, साखरा तसेच कठाणी नदीलगतचा परिसर ते खरपुंडी फाटा नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा झुडपांचा वेढा दिसून येतो.
विशेष म्हणजे या राष्ट्रीय महामार्गावरील झुडपे तोडण्याची मागणी अनेकदा संबंधित विभागाकडे करण्यात आली. परंतु दुर्लक्षच झाले. राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरूस्तीसाठी शासनाकडून दरवर्षी निधी प्राप्त होतो. परंतु सदर निधी कोणत्या कामावर खर्च केला जातो, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या मार्गावरील अपघात विरूद्ध दिशेने येणारे वाहन न दिसल्यामुळे घडलेले आहेत.
चार वर्षांपासून झाडे तोडण्याची मागणी
आरमोरी-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यालगतची झुडपे तोडण्याची मागणी मागील चार वर्षांपासून संबंधित विभागाकडे आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. परंतु या मागणीकडे कायमच दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. सदर मार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे काम चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात पोहोचले आहे. आरमोरी येथील बर्डी परिसरात सदर काम पोहोचले आहे. हे काम सुरू झाल्यानंतर लगतची झुडपे तोडली जाऊ शकतात. परंतु या कामाला दीड ते दोन वर्ष लागू शकतात. त्यामुळे तत्काळ या मार्गावरील झुडपे तोडावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुभाष सपाटे यांनी केली आहे.