कर्जवाटपाचा वेग मंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 09:50 PM2018-07-22T21:50:29+5:302018-07-22T21:51:38+5:30
जिल्हाभर सध्या समाधानकारक पाऊस असल्यामुळे रोवणीच्या कामांना वेग घेतला आहे. मात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज वाटपाचा वेग अजूनही मंदावलेलाच आहे. खरीप हंगामासाठी सहकार विभागाने दिलेल्या कर्जवाटपाच्या लक्ष्यांकापैकी जेमतेम ३६ टक्के लक्ष्य गाठण्यात आतापर्यंत यश आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हाभर सध्या समाधानकारक पाऊस असल्यामुळे रोवणीच्या कामांना वेग घेतला आहे. मात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज वाटपाचा वेग अजूनही मंदावलेलाच आहे. खरीप हंगामासाठी सहकार विभागाने दिलेल्या कर्जवाटपाच्या लक्ष्यांकापैकी जेमतेम ३६ टक्के लक्ष्य गाठण्यात आतापर्यंत यश आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मात्र कर्जवाटपात पुढे असून या बँकेने ७२ टक्के लक्ष्य गाठले आहे.
गेल्या १५ दिवसांपासून रोवणीची कामे सुरू आहेत. गेल्या रविवार आणि सोमवारच्या पावसानंतर पावसाने थोडी उसंत घेतली होती. त्यामुळे शेतीच्या कामांनी वेग घेतला. मात्र मजुरीचे दर, खताच्या वाढलेल्या किमती यामुळे शेतकऱ्यांना कर्जाची गरज आहे. हाती पैसा नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कामेही खोळंबली आहेत. बँकेत सध्या शेतकऱ्यांची गर्दी जास्त आहे. पण राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्जवाटपात आखडता हात घेत आहेत.
राष्ट्रीयकृत बँकांना यावर्षी खरीप हंगामासाठी १११ कोटी ६ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत या बँकांनी ४ हजार ३८४ शेतकऱ्यांना २४ कोटी ४० लाखांचे कर्जवाटप केले. उद्दीष्टाच्या तुलनेत हे कर्जवाटप अवघे २२ टक्के आहे. अॅक्सिस आणि आयसीआयसीआय या दोन्ही खासगी बँकांच्या कर्जवाटपाची स्थिती तर आणखीच बिकट आहे. त्यांनी ३ कोटी ९६ लाख रुपयांच्या उद्दीष्टापैकी केवळ ९ शेतकऱ्यांना ३२ लाख रुपयांचे कर्जवाटप केले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने ३१ कोटी ८० लाख रुपयांच्या उद्दीष्टापैकी ८ कोटी ५ लाख रुपयांचे कर्ज वाटले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र सहकार विभागाची लाज राखली आहे. त्यांनी ५६ कोटी ९ लाख रुपयांच्या कर्जवाटपाच्या उद्दीष्टापैकी ४० कोटी ३३ लाख रुपये कर्ज वाटून ७२ टक्के उद्दीष्ट गाठले आहे. या बँकेने सर्वाधिक १२ हजार १९९ शेतकऱ्यांना कर्ज दिले.
अशा पद्धतीने जिल्हाभरात आतापर्यंत सर्व बँकांमिळून अवघ्या १७ हजार ७७० शेतकऱ्यांना ७३ कोटी १० लाख रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. पुढील काही दिवसात जिल्हा बँक कर्जवाटपाचे उद्दीष्ट ओलांडू शकेल. मात्र इतर बँका दिलेले उद्दीष्टही गाठू शकेल किंवा नाही, याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
२३ टक्क्यांवर धानाची रोवणी आटोपली
मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात रोवणीच्या कामांना वेग आला आहे. सतत पाऊस असल्याने रोवणीच्या कामांमध्ये सातत्य आहे. धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५१ हजार हेक्टर आहे. आतापर्यंत ११ हजार ६२३ हेक्टरवर रोवणीची कामे तर २२ हजार ८७४ हेक्टरवर आवत्या, पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. याची टक्केवारी २३ टक्के एवढी आहे. सतत पाऊस पडत असल्याने वातवरणामध्ये गारवा आहे. त्यामुळे अपवाद वगळता पिकांवर किडीचा प्रादुर्भाव नाही. पाऊस सुरूच राहिल्यास पुढील १५ दिवसांत रोवणीची कामे आटोपण्याचा अंदाज आहे.
खतासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू
काही शेतकरी धानाच्या रोवणीच्या वेळीच खत टाकतात. तर काही शेतकरी रोवणा पूर्ण झाल्यावर खत टाकतात. रोवणीची कामे सुरू असल्याने खतासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यातील खत विक्रेत्यांकडे पुरेसे खत उपलब्ध आहे. त्याचबरोबर पॉस मशीनच्या सहाय्याने खत खरेदी करायचे असल्याने खते विक्रेत्यांकडून होणारी लुबाडणूक बंद झाली आहे.