सौरदिवे नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:40 AM2021-05-25T04:40:37+5:302021-05-25T04:40:37+5:30

एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त ...

Solar lights faulty | सौरदिवे नादुरुस्त

सौरदिवे नादुरुस्त

googlenewsNext

एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे निकामी झाले आहेत.

पशुखाद्य महागले

आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारला जातो. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्या.

अगरबत्तीनिर्मिती मजुरी वाढवा

गडचिरोली : वन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अगरबत्ती प्रकल्पांमध्ये शेकडो मजूर काम करीत आहेत. मात्र, अगरबत्ती बनविण्याचा दर अत्यंत कमी असल्याने मजुरांना कमी मजुरी मिळत आहे. त्यामुळे मजूर त्रस्त आहेत.

बीपीएल उत्पन्न मर्यादेची क्षमता वाढवा

आलापल्ली : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिला जात आहे. परंतु नागरिकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ झाली असल्याने बीपीएल यादीची उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी हाेत आहे.

ग्रामीण भागात रॉकेल मिळण्यास अडचण

आलापल्ली : जिल्ह्यात अवैधरीत्या रॉकेलची सर्रास विक्री होत असली तरी ग्रामीण भागात अनेक नागरिकांना राॅकेल मिळत नसल्याचे दिसून येेते. अनेक रॉकेल दुकानदार गैरमार्गाने रॉकेल विकत आहेत. त्यामुळे पुरवठा विभागाने संबंधितांवर कारवाई करावी.

अहेरीत वाहतूककोंडी

अहेरी : शहरातील बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी येणारे ग्राहकही रस्त्याच्या बाजूलाच दुचाकी वाहने पार्किंग करतात. त्यामुळेही रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण हटवावे, अशी मागणी हाेत आहे.

दोन बसची मागणी

अहेरी : शेकडो नागरिक दरदिवशी तेलंगणा राज्यात जातात. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तेलंगणासाठी दोन बस सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. कमलापूर परिसरात उमानूर, राजाराम, मरपल्ली, खांदला, रेपनपल्ली, तिमरम, गोविंदगाव, इंदाराम, रेगुलवाही या ग्रामपंचायती येतात.

रुग्णवाहिकेची गरज

कमलापूर : कमलापूर हे गाव अतिसंवेदनशील, दुर्गम भागात असून, या परिसरात अनेक गावांचा समावेश आहे. येथे ये-जा करण्यासाठी वाहतुकीच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. हे गाव मध्यवर्ती ठिकाणी असल्याने रेपनपल्ली, गुंडेरा, जिमलगट्टा यासह परिसरातील नागरिक येतात.

पोलीस चौकी सुरू करा

गडचिरोली : गडचिरोली आगार व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली बस स्थानक परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली होती. मात्र, या पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नाही. अनेकदा ही पोलीस चौकी कुलूपबंद दिसून येते. बस स्थानकातील पोलीस चौकी नियमित सुरू ठेवावी.

अल्पवयीन बनले चालक

गडचिरोली : शहरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन वाहनधारकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, याकडे उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलीस केवळ चारचाकी वाहनांवर अधिक कारवाई करीत असल्याचे दिसून येत आहे.

पूलनिर्मितीची मागणी

कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र, या नाल्यांवर अद्याप पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातूनच ये-जा करावी लागते. मात्र, या समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

भूमी अभिलेखची पदे रिक्त

एटापल्ली : उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मंजूर १७ पदांपैकी केवळ आठ पदे भरलेली आहेत. मुख्य उपअधीक्षकाचे पद रिक्त असून, सिरोंचा येथील अधिकाऱ्याकडे या पदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना एटापल्ली व सिरोंचा अशा दोन ठिकाणचा पदभार चालविणे कठीण झाले आहे.

काेपरअल्ली मार्ग खड्ड्यात

मुलचेरा : तालुक्यातील मुलचेरा ते मार्कंडा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व नागरिकांना होत आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

सिंचन सुविधेचा अभाव

सिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर परिसरात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र या परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे धानपीक करपते. या क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत आहे.

कृषिपंपांना वीजच नाही

देसाईगंज : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वीज जोडणी मिळाली नाही. शेतकरी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.

अतिक्रमण वाढले

गडचिरोली : गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या सिंचाई विभागाच्या तलावात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणाचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. या वर्षी तलावात पाणी कमी असल्याने आणखी जागा हडप करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून चालविला जात आहे. त्यामुळे अतिक्रमण काढावे.

Web Title: Solar lights faulty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.