विकलेला मका परत घेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 05:00 AM2020-10-02T05:00:00+5:302020-10-02T05:00:24+5:30
लॉट एंट्री न झाल्याचे कारण दाखवून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने शेतकऱ्यांना मका परत नेण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. परंतु शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून खरेदी केंद्रावर विक्री केलेला मका परत घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भातील निवेदन अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व धानोरा येथील उपव्यवस्थापकांना दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षीच्या उन्हाळ्यात आधारभूत खरेदी केंद्रावर मक्याची विक्री केली होती. परंतु लॉट एंट्री न झाल्याचे कारण दाखवून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने शेतकऱ्यांना मका परत नेण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. परंतु शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून खरेदी केंद्रावर विक्री केलेला मका परत घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भातील निवेदन अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व धानोरा येथील उपव्यवस्थापकांना दिले आहे.
व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होऊ नये तसेच मक्याची विक्री करणे सोयीचे व्हावे, यासाठी तालुक्यातील धानोरा, पेंढरी, मुरूमगाव येथे मका खरेदी केंद्र उन्हाळ्यात सुरू करण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे यासाठी पेंढरी जि. प. सर्कलमध्ये २५ ते ३० जुलैैपर्यंत पयडी व झाडापापडा येथे मका खरेदी करण्यात आला. परंतु तालुक्यातील १६ शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या मक्याचे चुकारे मिळाले नाही. त्याकरिता केंद्र सरकारच्या एनईएमएल पोर्टलवर लॉट एंट्री न झाल्याचे कारण दाखवून उपप्रादेशिक कार्यालयाकडून शेतकºयांना पत्र पाठवून आपला मका परत घेऊन जावा, अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून वेळेवर मका विकावा कुठे या विवंचनेत आहेत. पन्नेमारा, येरकड, कनेली, पेंढरी, पळसगाव, मोहगाव, रांगी, वडगाव, ढवळी, धानोरा, पयडी, झाडापापडा येथील शेतकऱ्यांना मका परत नेण्याबाबत उपप्रादेशिक कार्यालयाने पत्र दिले आहे. या सर्व शेतकऱ्यांनी एकूण १ हजार १७६.५० क्विंटल मका विक्री केला आहे. शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर विकलेला मक्याचे चुकारे लवकर द्यावे, अशी मागणी आनंदीबाई गावडे, मसरू टेकाम, गांडो आतला, मेहताब कुदराम, चमरू समरथ, मंगेश आतला, जयंती लकडा, परमेश्वर गावडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली.
पोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी कुणाची?
शेतकऱ्यांनी आपल्या मक्याची विक्री होऊन दोन महिने झाले व आता मका परत न्या म्हणून पत्र का देण्यात आले. शेतकऱ्यांनी वेळेवर आपला माल विकावा कुठे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. शासनाने दिलेल्या मुदतीत मक्याची विक्री शेतकऱ्यांनी केली व केंद्रांनी खरेदीसुद्धा केली. माल खरेदीनंतर पोर्टलवर माहिती टाकण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्याची आहे. यात शेतकऱ्यांची काय चुक? असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. जबाबदार कर्मचाऱ्यावर कारवाई करून शेतकऱ्यांच्या मक्याचे चुकारे अदा करावे, अशी मागणी धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यानी केली आहे.