जागा अडविली पण कामास सुरूवातच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:33 PM2018-03-19T23:33:31+5:302018-03-19T23:33:31+5:30
गडचिरोली येथील बसस्थानकाच्या नुतनीकरणासाठी १५ दिवसांपूर्वीच कंत्राटदाराने टीन लावून अर्ध्यापेक्षा अधिक जागा अडविली. त्यामुळे बस थांबण्यासाठी तसेच प्रवाशांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : गडचिरोली येथील बसस्थानकाच्या नुतनीकरणासाठी १५ दिवसांपूर्वीच कंत्राटदाराने टीन लावून अर्ध्यापेक्षा अधिक जागा अडविली. त्यामुळे बस थांबण्यासाठी तसेच प्रवाशांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहेत. उन्हामध्ये थांबून बसची वाट बघावी लागत आहे.
गडचिरोली बसस्थानकाच्या नुतनीकरणासाठी एसटी महामंडळाने सुमारे तीन कोटी रूपये उपलब्ध करून दिले आहेत. नुतनीकरण करण्यासाठी कंत्राटदाराने १५ दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरात टिन लावून अर्ध्यापेक्षा अधिक जागा अडविली आहे. एसटीचा बाहेर निघणारा मार्ग सुध्दा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी बसेस बसस्थानकावर उभ्या करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. परिणामी बसेस बसस्थानक परिसरात उभ्या केल्या जात आहेत. प्रवाशांनाही पुरेशी जागा नाही. त्यामुळे मिळेल तेथे आडोशाला थांबावे लागत आहे. उन्हाळा सुरू झाला असल्याने दिवसा कडक ऊन पडत आहे. या उन्हातच प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहेत. बांधकामाला तत्काळ सुरूवात करावी, अशी मागणी होत आहे.
एसटी विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानकाच्या मागील बाजूस टिनाचे शेड उभारण्यास सुरूवात केले आहे. मात्र उन्हामुळे टिनांच्या शेडमध्ये प्रवाशी बसतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बस शोधण्यासाठी प्रवाशांची धावपळ
मुख्य शहरांमध्ये जाणाऱ्या बसेस फलाटावर लागत होत्या. संबंधित गावाला जाणारे प्रवाशी त्या फलाटाजवळ थांबून बसची प्रतीक्षा करीत होते. तर ग्रामीण भागातील बसेस बसस्थानकाच्या समोर एका विशिष्ट जागेवर उभ्या ठेवल्या जात होत्या. नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशी त्या जागेजवळ थांबत होते. आता मात्र बसची जागा बदलली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचा गोंधळ उडत आहे.
असे राहणार नवीन बसस्थानक
नवीन बसस्थानकात जुन्या बसस्थानकात सद्य:स्थितीत केवळ पाच फलाट आहेत. नवीन बसस्थानकात सुमारे १४ फलाट राहणार आहेत. जुन्या बसस्थानकाच्या इमारतीचा काही प्रमाणात विस्तार करून त्या ठिकाणी आठ फलाट बांधले जाणार आहेत. वर्कशॉपच्या बाजुने तीन फलाट व मुख्य मार्गाकडील बाजुने तीन फलाट असे एकूण १४ फलाट राहणार आहेत. तीन व्यावसायिक गाळे सुध्दा राहणार आहेत.
बांधकामाला लवकरच सुरूवात होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानकाच्या मागच्या बाजुला टिनाचे शेड उभारले जात आहे. या ठिकाणी पंखा, ट्युब लाईट आदींची व्यवस्था केली जाणार आहे.
- विनय गव्हाळे, विभागीय नियंत्रक, गडचिरोली