तेलंगणामार्गे कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात विशेष खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 08:55 PM2020-04-09T20:55:22+5:302020-04-09T20:56:59+5:30
तेलंगणात रोजगारानिमित्त गेलेल्या मजुरांमार्फत गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसला तरी आजुबाजूच्या काही जिल्ह्यांसह लगतच्या तेलंगणातील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तेलंगणात रोजगारानिमित्त गेलेल्या मजुरांमार्फत गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. गडचिरोलीकडे येणाऱ्या मजुरांच्या लोंढ्यांना आता तेलंगणातच रोखले जात आहे.
मिरची तोडाईसह शेतीच्या इतर कामांसाठी गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातील मजूरवर्ग छत्तीसगडमध्ये गेला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर या मजुरांची कामेही बंद झाली. पण प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे अनेक मजुरांनी ३०० ते ४०० किलोमीटरचा पायी प्रवास करून आपले गाव गाठले. अजूनही अनेक मजूर तेलंगणात अडकून पडले आहेत. तेलंगणातील लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्या मजुरांमार्फत गडचिरोलीत कोरोनाचे विषाणू येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा प्रशासनाने त्यांना तेलंगणाच्या सिमेतच रोखण्याची सूचना तेथील प्रशासनाला केली आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्राप्रमाणेच तेलंगणा सरकारनेही तिकडे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू करून त्यांची उपासमार थांबविली आहे.