रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 06:00 AM2019-12-15T06:00:00+5:302019-12-15T06:00:30+5:30
वन विभागाच्या जमिनीमुळे परवानगी मिळण्यास विलंब लागत आहे. मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नसल्याने नागरिकांमध्ये केंद्र शासनाविषयी असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने जमीन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली आहे. रेल्वेसोबतच इतर मागण्यांचे निवेदन सादर करून त्यांच्यासोबत चर्चा केली.
वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाला २०१५ मध्ये रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही जमीन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण झाली नाही. वन विभागाच्या जमिनीमुळे परवानगी मिळण्यास विलंब लागत आहे. मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नसल्याने नागरिकांमध्ये केंद्र शासनाविषयी असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने जमीन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी केली. यावेळी खासदारांनी नागभिड-नागपूर या ब्रॉडगेज मार्ग, नागभिड व आमगाव येथे दरभंगा एक्सप्रेसचा थांबा मंजूर करणे आदी मागण्यांवर चर्चा केली. आपण स्वत: लक्ष घालून वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाला गती देऊ, असे आश्वासन पियुष गोयल यांनी दिले. नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल असल्याने या जिल्ह्यासाठी विशेष निधी देण्याचीही मागणी खासदारांनी केली.