चामाेर्शी तालुक्यातील कुनघाडा(रै.) ईरइ, काशिपूर, अंकोला, बांधोना, नवरगाव, गट्टेगुळा, गिलगाव, भेंडीकन्हार, थाटरी, बेनोली, पोटेगाव परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी गिलगाव ज.- पोटेगाव बसफेरी सुरू करण्यात आली होती. मात्र मागील वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे बसफेरी बंद करण्यात आली. कुनघाडा(रै.) व गिलगाव ज. परिसरात गडचिरोली वरून कोणतीच बसफेरी नसल्याने गिलगाव परिसरातील प्रवाशांना कुनघाडा फाट्यावर येऊन गडचिरोलीकडे जाणारी बस पकडावी लागते. यासाठी त्यांना ७-८ किमीचे अंतर पार करावे लागते. गिलगाव ग्रामपंचायतच्या मासिक सभेत याबाबत ठराव घेण्यात येऊन तो गडचिरोली आगाराकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे या मागणीची दखल घेऊन गडचिरोली- गिलगाव-पोटेगाव बसफेरी सुरू करावी, अशी मागणी गिलगावच्या सरपंच रेखा अलाम यांच्यासह उपसरपंच मनोज चापडे, ग्रां.प. सदस्य मोहित अलाम, संध्या मोगरकर, शालू अलाम, नयना कड्याम, शकुंतला तुंकलवार यांनी केली आहे.
गडचिरोली-गिलगाव-पोटेगाव बस सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:34 AM