स्टेट बँकेचे एटीएम सहा महिन्यांपासून कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:36 AM2021-02-13T04:36:05+5:302021-02-13T04:36:05+5:30
आरमाेरी : येथील स्टेट बँक शाखेच्या एटीएम मध्ये बिघाड आल्याने गेल्या सहा महिन्यांपासून मशीन कुलूपबंद आहे. मात्र सदर ...
आरमाेरी : येथील स्टेट बँक शाखेच्या एटीएम मध्ये बिघाड आल्याने गेल्या सहा महिन्यांपासून मशीन कुलूपबंद आहे. मात्र सदर एटीएम दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन मशीन लावण्याबाबत स्टेट बँक प्रशासनाने काहीच कार्यवाही केली नाही. शहरासह तालुक्यातील ग्राहकांना दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढावे लागतात. त्यांना आर्थिक भूर्दंड पडत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत.
आरमोरी येथील मुख्य मार्गालगत स्टेट बँकेची शाखा आहे. या बँकेच्या खातेदारांची संख्याही माेठी आहे. खातेदारांना पैसे काढणे सोईचे व्हावे म्हणून बँकेला लागूनच एटीएम सुरू करण्यात आले. त्यामुळे अनेक लोक बँकेत गर्दी न करता एटीएममधून पैसे काढत होते. बँकेचे एटीएम नियमित सुरू असताना एसीचे पाणी मशीनमध्ये गेल्याने मशीन जळाली. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून एटीएम कुलूपबंद आहे. मात्र एवढा कालावधी उलटूनही एटीएम सुरू करण्याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. या प्रकाराने स्टेट बँकेच्या खातेदाराची डोकेदुखी वाढली आहे. येथील अनेक खातेदारांना गांगलवाडी, वडसा व ब्रम्हपुरी येथे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भूर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागतो. सहा महिने उलटूनही मशीन का सुरू करण्यात आली नाही, अशी विचारणा करुन अनेक ग्राहक नाराजी व्यक्त करीत आहेत. स्टेट बँकेने खातेदारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये व तत्काळ नवीन एटीएम मशीन लावावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.