झिंगानूर-सिरकोंडा मार्गावरील वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:11 PM2018-07-22T22:11:59+5:302018-07-22T22:13:14+5:30
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर-सिरकोंडा मार्गावर काही ठिकाणी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे या मार्गाने चारचाकी व दुचाकी वाहने काढण्यास वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर-सिरकोंडा मार्गावर काही ठिकाणी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे या मार्गाने चारचाकी व दुचाकी वाहने काढण्यास वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
झिंगानूर-सिरकोंडा मार्गावर झिंगानूर गावानजीक एक नाला आहे. या नाल्याची उंची वाढविण्यासाठीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, या उद्देशाने पुलाच्या लगत कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. सदर कच्च्या रस्ता मुरूम टाकून तयार करण्यात आला. मृग व आद्रा नक्षत्राच्या सुरूवातीच्या पावसाने हा मुरूम व्यवस्थित बसला. मात्र त्यानंतर १६ जुलै रोजी गडचिरोली शहरसह सिरोंचा व अहेरी तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. या पावसादरम्यान पाण्याच्या प्रवाहाने रस्त्यावर टाकलेला मुरूम वाहून गेला. त्यामुळे आता या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चारचाकी वाहने या रस्त्यावरील चिखलात फसत आहेत. मात्र त्यानंतर स्थानिक प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने सदर मार्गावर गावातून जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला नाही. चिखलमय झालेल्या या रस्त्यावर तत्काळ मुरूम टाकून रस्ता व्यवस्थित करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर परिसरात अनेक ठिकाणी नाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील मोठ्या नद्यांना पूर येते. नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर नाल्यावरही पाणी चढते. त्यामुळे या भागातील वाहतूक मुसळधार पावसादरम्यान अनेकदा खंडीत होते. शासन व प्रशासनाच्या वतीने या संदर्भात अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने झिंगानूर परिसरातील नागरिकांना आवागमनासाठी मोठी कसरत करावी लागते.
अहेरी उपविभागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा कायम
एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा व अहेरी या आदी पाच तालुके अहेरी उपविभागात मोडतात. गडचिरोली जिल्हा निर्मितीला ३५ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र अहेरी उपविभागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा अद्यापही कायम आहे. एटापल्ली तालुक्यातील अनेक मुख्य डांबरी रस्ते उखडले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक होत आहे. भामरागड व सिरोंचा शहरातील अंतर्गत रस्त्याची अवस्था बकाल झाली आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मजबूत व दर्जेदार होण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. तशी मागणीही अहेरी उपविभागातील नागरिकांकडून सातत्याने होत आहे. अहेरी उपविभागात अनेक मुख्य रस्त्यालगत मोठे झाडे असून या झाडांच्या फांद्याही वाढल्या आहेत. वादळाने झाडे रस्त्यावर कोसळून रहदारीस अडथळा निर्माण होत असते.