मामा तलावातील विहिरीचे काम तत्काळ बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:34 AM2021-02-14T04:34:13+5:302021-02-14T04:34:13+5:30
गडचिराेली : ग्रामपंचायत मुरखळाची (नवेगाव) कुठलीही परवानगी न घेता गावानजकीच्या मामा तलावात शासकीय इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेसाठी विहिरीचे बांधकाम ...
गडचिराेली : ग्रामपंचायत मुरखळाची (नवेगाव) कुठलीही परवानगी न घेता गावानजकीच्या मामा तलावात शासकीय इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेसाठी विहिरीचे बांधकाम सुरू आहे. तलावात विहिरीचे बांधकाम झाल्यास विहिरींना जमिनीतून हाेणारा नैसर्गिक पाणीपुरवठा बंद हाेऊन पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण हाेईल. त्यामुळे मामा तलावात सुरू असलेले विहिरीचे काम तत्काळ बंद करावे, अशी मागणी नवेगावातील नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग गडचिराेली, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पाेलीस अधीक्षक, पाेलीस निरीक्षक, खासदार, आमदार, जि.प.अध्यक्ष, जि.प.सदस्य तसेच मुरखळा, नवेगावच्या सरपंच व ग्रामसेवकास निवेदन देण्यात आले. निवेदनावर उमेश उईके यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, सन २०१९ मध्ये शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेकरिता मामा तलावामध्ये विहीर बांधकामाचा शासनाने प्रस्ताव ठेवला. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग जि.प.गडचिराेलीमार्फत प्रस्तावित करण्यात आला. मामा तलावामध्ये विहीर व नळ याेजनेचे काम झाल्यास शेती सिंचन तसेच गुराढाेरांसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण हाेईल. विहिरीच्या पाण्याची पातळी खालावून टंचाई निर्माण हाेईल. त्यामुळे मामा तलावातील विहिरीचे काम बंद करावे, ते न केल्यास उपाेषण करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.