चिखलीतील मुस्लीम बांधवांची अशीही सहृदयता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:27 PM2019-08-12T23:27:15+5:302019-08-12T23:28:54+5:30
विहिरीतील विषारी वायूमुळे तालुक्यातील चिखली येथील प्रमोद डहाळे व अजय मच्छिरके या दोघांचा रविवारी मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. अशा वातावरणात गावातील मुस्लीम समाजबांधवानी सोमवारी ईदचा आनंदोत्सव टाळत मृतकांच्या अंत्यविधीत आणि शोकमग्न परिवाराच्या दु:खात सहभागी होऊन सहृदयतेचा परिचय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : विहिरीतील विषारी वायूमुळे तालुक्यातील चिखली येथील प्रमोद डहाळे व अजय मच्छिरके या दोघांचा रविवारी मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. अशा वातावरणात गावातील मुस्लीम समाजबांधवानी सोमवारी ईदचा आनंदोत्सव टाळत मृतकांच्या अंत्यविधीत आणि शोकमग्न परिवाराच्या दु:खात सहभागी होऊन सहृदयतेचा परिचय दिला.
चिखली हे गाव कुरखेडा तालुकास्थळापासून सहा किमी अंतरावर आहे. या गावात मुस्लीम धर्माचे जवळपास ३० कुटुंब व हिंदू धर्माचे ५०० कुटुंब आहेत. दोन्ही धर्माचे नागरिक एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतात. तसेच एकमेकांचे सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात. त्यामुळे गावात नेहमीच एकोपा राहण्यास मदत होते. सोमवारी ईदचा सण असताना रविवारी चिखली गावातील शेतकरी व शेतमजुराचा विहिरीतील विषारी वायुमुळे मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली होती. दोघांवरही सोमवारी अंतिम संस्कार करण्यात आले. या घटनेचे दु:ख गावातील प्रत्येकाला होते. मुस्लिम कुटुंबियांनीही जणू आपल्याच घरातील कोणी व्यक्ती गेल्याच्या भावनेने हळहळ व्यक्त केली.
सोमवारी ईद हा मुस्लीम समाजाच्या प्रमुख सणांपैकी एक सण होता. मात्र गावावर शोककळा पसरली असताना ईदचा आनंदोत्सव साजरा करने योग्य होणार नाही ही बाब मुस्लीम समाजातील नागरिकांनी जाणली. त्यामुळे ईदचा आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला. नमाज पठनानंतर होणारी बकरा कुर्बानी टाळून मृतकांच्या अंत्यविधीत सहभाग घेतला. हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी चिखली मुस्लीम समाजाचे अध्यक्ष अकबर पटेल, उपाध्यक्ष आरीफ सौदागर, मुजमील पठान, आबाद पटेल, अयुब शेख, आगा पटेल, नबी शेख, इरफान शेख, मुन्ना पठान, शफीक शेख, बबलू पठान, शब्बीर पठान आदींनी पुढाकार घेतला. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे, याचा अनुभव चिखलीतील नागरिकांना या निमित्ताने घेता आला.
ईदचा अर्थच आनंदोत्सव आहे. मात्र गावात शोककळा असताना ईद साजरी करणे उचित नव्हते, त्यामुळे मुस्लीम समाजाने आज बकरा कुर्बानीसह कोणताच आनंदोत्सव साजरा केला नाही. मस्जीदमध्ये नमाज पठनानंतर सर्व बांधव अंत्यविधीत सहभागी झाले. गावातील सर्व हिन्दू व मुस्लीम नेहमीच एकमेकांचा सुख-दु:खात सहभागी होत असतात. ही सद्भावना कायम राहावी याकरिता हा निर्णय घेतला.
- अकबर पटेल, अध्यक्ष
मुस्लिम समाज मंडळ चिखली