आरमोरी : दु:खाची गडद छाया एखाद्या कुटुंबाच्या शिरावर असली की, व्यक्तीला जीवन नकाेसे करून टाकते. तरीसुद्धा काहीजण दु:ख पचवून जाेमाने काम करतात. परंतु, तरीही दु:ख साथ साेडत नसेल तर व्यक्ती हतबल हाेताे. शेवटी नियतीपुढे गुडघे टेकताे. अशाचप्रकारे दु:खाची गडद छाया चुरमुरा येथील रामटेके कुटुंबावर असल्याचा अनुभव या कुटुंबीयांना आला. दीड वर्षांपूर्वी वडिलांना खाेब्रागडी नदीने हिरावले तर आता २१ मे राेजी मुलाचे आकस्मिक निधन झाल्याने रामटेके कुटुंबावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. या दाेन्ही घटनांमुळे मुलाची आई निराधार झाली आहे.
आरमोरी तालुक्याच्या चुरमुरा येथील प्रतीक उर्फ प्रीतम गोवर्धन रामटेके या २१ वर्षीय तरुणाचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. दीड वर्षांपूर्वी प्रतीकचे पितृछत्र हरपले होते. वडील देऊळगाव येथील खोब्रागडी नदीपुलावरून पात्रात पडून वाहून गेले होते. त्या दुःखातून सावरत नाही, तोच काळाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. पुन्हा त्यांच्या कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले आणि एकाएकी प्रतीकलाही नियतीने आपल्या कवेत घेतले. एकावर एक आलेल्या संकटांनी कुटुंब हादरून गेले. एक शांत, संयमी आणि अतिशय कमी वयात व उमेदीच्या काळात प्रतीक सर्वांना सोडून गेला. त्याच्या मृत्यूची बातमी गावात कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त हाेत आहे. सतत मम्मी म्हणून दररोज आईला फोन करून बोलणाऱ्या प्रतीकचा आवाज नेहमीसाठी काळाच्या पडद्याआड गेला. पतीच्या निधनानंतर दुःख झेलणाऱ्या मातेवर मुलाच्या मृत्यूने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या जगण्याचा आधारच हिरावला गेला. या कुटुंबावर कोसळलेले दुःख पाहून गावकरी व नातेवाईकांचीही मने हेलावली.
बाॅक्स
काेविड सेंटरमध्ये करत हाेता काम
आईचा आधार असलेल्या प्रतीकला अतिशय कमी वयात आपल्या आईची साथ सोडावी लागली. आपल्या आयुष्याची स्वप्नं रंगवून अतिशय मेहनतीने काम करणारा प्रतीक घर चालविण्यासाठी धडपडत होता. गडचिरोली येथील कोविड सेंटरमध्ये तो राेजंदारीवर काम करत असताना अचानक त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याला उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने त्याला तेथून नागपूर येथे नेण्यात आले. मात्र, त्याचे नागपूर येथे २१ मे राेजी सकाळी निधन झाले.
===Photopath===
230521\img_20210523_163330.jpg
===Caption===
प्रतीक रामटेके फोटो